मासेमारी `या` कालावधीत राहणार बंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार मासळीच्या साठ्याचे जतन करण्याच्या हेतूने शासनाने हा बंदी कालावधी निश्‍चित केला आहे. हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मोठ्या प्रमाणात मासळीचा साठा वाढतो.

रत्नागिरी - मासेमारी हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. मासळीच्या साठ्याचे जतन करण्याच्या उद्देशाने 1 जून ते 31 जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना मासेमारीला बंदी घातली आहे. यंदा निसर्गाची वक्रदृष्टी आणि कोरोनाच्या संसर्गामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी मासळी व्यवसायाची परिस्थिती झाली आहे. 

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमानुसार मासळीच्या साठ्याचे जतन करण्याच्या हेतूने शासनाने हा बंदी कालावधी निश्‍चित केला आहे. हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मोठ्या प्रमाणात मासळीचा साठा वाढतो. म्हणून 1 जून ते 31 जुलै या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकांना मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. ही मासेमारी बंदी यांत्रिकी मासेमारी नौकांना लागू असून पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.

सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यंत यांत्रिकी मासेमारी नौका बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास ती नौका आणि त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच अधिकाधिक कठोर शिक्षा केली जाईल. बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिकी मासेमारी नौकेस अपघात झाल्यास शासनाकडून नुकसानभरपाई मिळणार नाही, असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे. 

निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे आधीच मासेमारी हंगाम मच्छीमारांच्या हातून निघून गेला आहे. वादळी वारे, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आदींमुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आहे. त्यात हंगामाचे शेवटचे दोन महिने होते. ते देखील कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निघून गेले. त्यामुळे मासळी उत्पादनावर यंदा मोठा परिणाम झाला आहे. वार्षिक मासळी उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटले आहे. काही महिने उलाढालच ठप्प झाल्याने मच्छीमारी व्यवसाय यंदा आतबट्यात आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban On Fishing From First June To 31 July Ratnagiri Marathi News