esakal | बॅंकेच्या शाखा व्यवस्थापिकेचा खून करून मृतदेह खाडीत फेकला, कोकणात सात लाखांसाठी कुठे घडला प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

०

तालुक्‍यातील धोपावे व नवानगर धक्‍क्‍यादरम्यान एका महिलाचा मृतदेह तरंगत असल्याचे काही मच्छीमारांच्या निदर्शनास आले.

बॅंकेच्या शाखा व्यवस्थापिकेचा खून करून मृतदेह खाडीत फेकला, कोकणात सात लाखांसाठी कुठे घडला प्रकार

sakal_logo
By
मयुरेश पाटणकर

गुहागर (जि. रत्नागिरी) : विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा वेलदूरच्या शाखा व्यवस्थापिका सौ. सुनेत्रा सुनील दुर्गुळे (वय 56, मूळ गाव चिपळूण, सध्या राहणार वेलदूर) यांचा अज्ञाताने खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. दाभोळ खाडीत धोपावे व नवानगरच्या दरम्यान त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना गुरूवारी सकाळी आढळून आला होता. मोठ्या दगडाला दोरी बांधून तिचे टोक दुर्गुळे यांच्या शरीराला बांधलेले होते. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. 

तालुक्‍यातील धोपावे व नवानगर धक्‍क्‍यादरम्यान एका महिलाचा मृतदेह तरंगत असल्याचे गुरुवारी (ता. 17) सकाळी सातच्या दरम्यान काही मच्छीमारांच्या निदर्शनास आले. ही माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले. दाभोळ खाडीत जमिनीवर उभे राहावे अशा पद्धतीने तरंगत असलेला मृतदेह पाहिल्यावर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आज सर्वपित्री अमावास्या असल्याने दुपारी भरतीला जोर होता. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांना मृतदेह काढण्यासाठी दोन तास धडपडावे लागले. संशयास्पद मृत्यू असल्याने अत्यंत सावधपणे हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यावेळी मृतदेहाच्या मांड्यांना दोरखंड बांधलेला होता. दोरखंडाच्या दुसऱ्या टोकाला मोठा दगड बांधण्यात आला होता. त्यावरुन हा खून असल्याचा ठाम निष्कर्ष पोलिसानी काढला. 

माहिती मिळाल्यापासूनच पोलिसांनी तपासाचा वेग वाढविला होता. सुनेत्रा दुर्गुळे यांच्या मोबाईलमधील फोन क्रमांकांची माहिती घेणे, कोणाकोणाला कशाप्रकारे कॉल झाले याची माहिती घेणे, गुहागर चिपळूण दरम्यानच्या सीसटीव्ही फुटेज संकलित करणे अशी कामे सुरू केली आहेत. एका विश्वसनीय वृत्तानुसार सौ. सुनेत्रा दुर्गुळे बुधवारी दुपारी तीननंतर वेलदूर शाखेतून बाहेर पडल्या. सायंकाळी 6.55 वा. बॅंकेच्या रत्नागिरी कार्यालयात त्यांनी रिपोर्टिंगही केले. सुनेत्रा दुर्गुळे वेलदूरमध्ये भाड्याने रहात असतं. बुधवारी (ता. 16) सायंकाळी वेलदूरला परतण्यासाठी गाडी मिळत नसल्याने मी चिपळूणला जात आहे. असा निरोप त्यांनी वेलदूरच्या घरमालकांना दिल्याचे कळते. 

त्यांच्याकडे होते सात लाख रुपये
सौ. सुनेत्रा दुर्गुळे बुधवारी (ता. 16) चिपळूणहून वेलदूरला आल्या. त्यावेळी सोने खरेदीसाठी त्यांनी आपल्यासोबत सात लाख रुपये आणले होते. बुधवारी सायंकाळी 5.57वाजता चिपळूणच्या घरी फोन करुन रात्री जेवायला घरी येत असल्याचे सांगितले होते. 6.41 च्या दरम्यान फिर्यादी तृप्ती हिने आईला (सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांना ) फोन केला होता. मात्र त्यानंतर 7.53 वाजता त्यांचा फोन स्वीच ऑफ असल्याचे सांगत होते. त्यामुळे सदरचा खून सात लाख रुपयांसाठी झाला का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

शाखाधिकारी म्हणून उत्तम काम 
दरम्यान, सौ. सुनेत्रा दुर्गुळे लिपिक म्हणून बॅंकेत नोकरीला लागल्या. त्यानंतर त्याची अधिकारी पदावर पदोन्नती झाली. त्यानंतर पुन्हा एकदा शाखाधिकारी म्हणून त्यांची पदोन्नती झाली. वेलदूरमध्ये शाखाधिकारी म्हणून त्या उत्तम काम करत होत्या. 

संपादन : विजय वेदपाठक

loading image
go to top