बदनामीकारक पोस्ट, दोन गट भिडले, घरात घुसून मारहाण

दीपेश परब
Sunday, 6 September 2020

येथीलच एका गटाच्या व्यक्तीने दुसऱ्या गटातील व्यक्तींबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यावरून दुसऱ्या गटातील महिला व पुरुष यांच्याकडून पहिल्या गटातील व्यक्तींना घरात घुसून मारहाण झाली.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील पेंडूर गावात आज सकाळी दोन गटांत हाणामारी झाली. फेसबुकवर टाकलेल्या एका गटाच्या विरोधातील आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्टमुळे हा वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, येथील पोलिस स्थानकात रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

याबाबत मिळलेल्या माहितीनुसार, येथीलच एका गटाच्या व्यक्तीने दुसऱ्या गटातील व्यक्तींबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह, बदनामीकारक पोस्ट शेअर केल्यावरून दुसऱ्या गटातील महिला व पुरुष यांच्याकडून पहिल्या गटातील व्यक्तींना घरात घुसून मारहाण झाली.

दरम्यान, या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तींनी आपल्याला घरात घुसून मारहाण केल्याची माहिती दिली. यावेळी या मारहाणीत जखमी झालेल्या पहिल्या गटातील संजय सहदेव नेमण (वय 35), स्वप्नील रघुनाथ नेमण (वय 32), अच्युत रामचंद्र नेमण (वय 34) यांच्या डोक्‍याला, संदेश नेमण याच्या हातापायाला तर दुसऱ्या गटातील उमेश अर्जुन सावंत (वय 41) यांच्या डोक्‍याला दुखापत झाल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल केले होते.

यातील संजय नेमण, स्वप्नील नेमण, अच्युत नेमण यांना येथील डॉ. कोळमकर यांनी उपचार करून ओरोस येथे सिटीस्कॅन व एक्‍सरेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती येथील ग्रामीण रुग्णालयातून मिळाली आहे. या मारहाणीत गंभीररित्या जखमी झालेल्या व ओरोस रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून जाब जबाब घेऊन संबंधितांवर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beating in two groups for posting on Facebook