परशुराम - आरवली मार्गावरील खड्डे भरण्यास सुरवात

मुझफ्फर खान
Saturday, 21 November 2020

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे

चिपळूण - परशुराम ते आरवली दरम्यान रस्त्याचे चौपदरीकरण करणार्‍या कंपनीने रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. आमदार शेखर निकम आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या सूचनांचे पालन कंपनीने पाऊस संपल्यानंतर तत्काळ खड्डे भरण्यास सुरवात केल्यामुळे दिवाळीत सुट्टीसाठी कोकणात येणारे पर्यटक आणि चाकरमान्यांचा प्रवास सुखकर झाला आहे. 

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. खेड तालुक्यातील दुपदरी मार्गाचे 70 टक्केहून अधिक काम पूर्ण झाले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील परशुराम ते आरवली दरम्यानच्या रस्त्याचे कामही वेगाने सुरू आहे. शंभर टक्के चौपदरीकरण झाले नसले तरी कामाला गती प्राप्त झाली आहे. पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर पडलेले खड्डे भरून महामार्ग वाहन चालकांसाठी मोकळा ठेवण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे. परशुराम ते आरवली दरम्यान पावसाळ्यात रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. हे खड्डे भरण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेस, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व त्या त्या गावातील नेत्यांनी महामार्ग विभागाकडे मागणी केली होती. महामार्ग विभागाने खड्डे भरण्यासाठी सुमारे साडेचार कोटीची निविदा प्रक्रिया राबवली. हे काम मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले. रस्त्यावर पडलेले खड्डे 180 दिवसात भरण्याचा कालावधी कंपनीला देण्यात आला होता. मात्र लॉकडाउनमुळे कंपनीचे कर्मचारी गावी गेल्यानंतर कंपनीला खड्डे भरता आले नाही. त्यामुळे मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीचा ठेका रद्द करून चेतक ईगल कंपनीने पावसाळ्यानंतर खड्डे भरण्यास सुरवात केली आहे.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी व पर्यटक कोकणात येत आहेत. मुंबई, पुणेसह पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना गुहागर, दापोलीत जाण्यासाठी चिपळूणमार्गे जावे लागते. परशुराम, चिपळूण शहर, कापसाळ, कळंबस्ते, फरशीतिठा, कामथे घाट येथील रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यात आले आहे. त्यामुळे चाकरमानी व पर्यटकांचा मार्ग सुखकर झाला आहे. कोंडमळा, सावर्डे, आरवली, असुर्डे दरम्यान खड्डे भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे.  

हे पण वाचा दिवाळीत बेळगावात प्रदूषण घटले, फटाके बंदीचा परिणाम

 

परशुराम ते आरवली दरम्यानच्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने निविदा प्रक्रिया राबवून हे काम मनिषा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले होते. चेतक - ईगल कंपनीच्या खात्यातून सुमारे साडेचार कोटी यासाठी मनिषा कंपनीला दिले जाणार होती. मात्र मनिषा कंपनीने खड्डे भरण्याचे कामच केले नाही. त्यामुळे चेतक ईगल कंपनीने स्वतः खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे.

-जयंतीलाल नेनेचा, जनसंपर्क अधिकारी चेतक ईगल इंडिया कंपनी चिपळूण

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Begin filling of pits on Parashuram Aravali road