कुटुंब नियोजनात यंदा `हा` जिल्हा मागे

नंदकुमार आयरे
Monday, 3 August 2020

जिल्हा कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रतिवर्षी प्रभावीपणे राबवित असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या व जन्म प्रमाण नियंत्रणात राहिले आहे. गेल्या पाच वर्षात जन्म प्रमाणात तब्बल दोन टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

सिंधुदुर्गनगरी -  जिल्ह्यात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत गेल्या पाच वर्षात प्रतिवर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट सरासरी 80 टक्के पूर्ण करून सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात आघाडीवर होता; मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना स्थितीत कुटुंब नियोजन कामात अडथळा ठरत आहे. 

जिल्हा कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रतिवर्षी प्रभावीपणे राबवित असल्याने जिल्ह्याची लोकसंख्या व जन्म प्रमाण नियंत्रणात राहिले आहे. गेल्या पाच वर्षात जन्म प्रमाणात तब्बल दोन टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे काम करून जिल्ह्याला प्राप्त झालेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट प्रतिवर्षी सरासरी 80 टक्के पूर्ण करीत आहे. त्यानुसार 2015-16 मध्ये मिळालेल्या 3380 शस्त्रक्रियांच्या उद्दिष्टापैकी 2739 शस्त्रक्रिया पूर्ण करून 81 टक्‍के काम केले आहे.

2016-17 मध्ये 2874 उद्दिष्टापैकी 2344 शस्त्रक्रिया पूर्ण करून 80.5 टक्के काम केले. 2017-18 मध्ये 2874 उद्दिष्टापैकी 2266 शस्त्रक्रिया पूर्ण करून 78.5 टक्के काम केले आहे. 2018-19 मध्ये 2635 उद्दिष्टापैकी 2016 शस्त्रक्रिया करून 76.51 टक्के काम केले तर 2019-20 मध्ये मिळालेल्या 2635 उद्दिष्टापैकी 2100 शस्त्रक्रिया करून 79.69 टक्‍के काम केले आहे; मात्र 2020-21 मध्ये संपूर्ण राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचे संकट ओढवल्याने जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोरोना महामारी रोखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करताना दिसत आहे; मात्र अद्यापही जिल्ह्यात या साथीवर पूर्णपणे नियंत्रण मिळालेले नाही.

कोरोना महामारीचा फटका कुटुंब नियोजन कार्यक्रमाला बसला आहे. चालू वर्षी मिळालेल्या 2635 उद्दिष्टापैकी अद्याप 25 टक्केही काम पूर्ण करता आलेली नाही. जिल्ह्यात उद्‌भवलेली कोरोना महामारीची साथ कुटुंब नियोजन कार्यक्रमात अडथळा ठरली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे घटलेले जन्म प्रमाण 

2015 - 9.8 
2016 - 9.05 
2017 - 9.2 
2018 - 8.95 
2019 - 8.77 

संपादन - राहुल पाटील
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Behind Sindhudurg district in family planning