जुनेच दिग्गज मैदानात ; आता शिवसेना होणार आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

कोरोनाचा जोर ओसरताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्गच्या पालकमंत्रिपदासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना आमदार राजन साळवी व भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील वावर वाढला आहे. आमदार जाधव उत्तर रत्नागिरीत, तर आमदार साळवी दक्षिण रत्नागिरीत सक्रिय झाले आहेत. हे जुने दिग्गज मैदानात उतरल्याने आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेचा आक्रमक बाणा दिसण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाचा जोर ओसरताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. नुकतेच शिवसेना जिल्हाप्रमुख आणि नेत्यांची बैठक घेऊन महाराष्ट्रावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेश दिले. काही जिल्ह्यात संपर्कमंत्र्यांची नियुक्तीदेखील केली. 

हेही वाचा - अजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

त्याचे परिणाम आता जिल्ह्यातील शिवसेनेत दिसू लागले आहेत. भास्कर जाधव आणि राजन साळवी या दोघांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने क्षमता असूनही दोघे मतदार संघातच सक्रिय होते. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना उच्च व तंत्र शिक्षणखात्याचे मंत्रिपद आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्रिपद मिळाले. परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे रत्नागिरीचे पालकमंत्रिपद आले. सामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या कामाचा ठसा उमटवला; मात्र परब यांच्याकडे कामाचा प्रचंड पसारा असल्याने ते जिल्ह्याला वेळ देऊ शकले नाहीत.

रत्नागिरी जिल्ह्यात संपर्कमंत्री म्हणून कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उदय सामंत हेच रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी सांभाळत होते. तेथेही त्यांनी उत्तम काम केले. आमदार जाधव यांनी युवासेनेच्या माध्यमातून उत्तर रत्नागिरी ढवळून काढण्यास सुरवात केली आहे. दुसऱ्या बाजूने आमदार राजन साळवी यांनीदेखील संघटनेच्या कामाला सुरवात केली. गावभेट दौरा शिवसैनिकांच्या बैठका छोटेमोठे कार्यक्रम घेत शिवसैनिकांमधील उत्साह त्यांनी कायम ठेवला.

...म्हणून आक्रमक शैलीचे....सक्रिय व्हा..

जाधव आणि साळवी हे दोघेही मतदार संघ वगळता फारसे सक्रिय नव्हते. सामंत याना पश्‍चिम महाराष्ट्रातील दोन मोठ्या जिल्ह्यात संपर्क ठेवावा लागणार आहे. त्याचे परिणाम रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षसंघटनेवर होऊ नयेत, म्हणून आक्रमक शैलीचे जाधव आणि साळवी यांना जिल्ह्यात सक्रिय होण्याचे आदेश मातोश्रीवरून काढले आहेत.

हेही वाचा -  रत्नागिरीकरांची तब्बल २८ कोटींची फसवणूक ; तीन संशयितांना अटक -

"भास्कर जाधव, रामदास कदम, राजन साळवी, उदय सामंत यांच्यासारखे खंबीर नेतृत्व रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेला लाभले आहे. पक्षात गटतट नाहीत. आगामी काळात शिवसेनेतील भगवे चैतन्य पाहायला मिळेल." 

- बाळा कदम, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख

 

संपादन - स्नेहल कदम 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaskar jadhav and rajan salvi is in race of politics in ratnagiri now in days