शिवसेना आमदार जाधव यांच्या प्रश्नाला ठेकेदार मात्र निरुत्तर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

आमदार जाधव यांनी थेट मोडकाआगर पुलापर्यंत जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

गुहागर (रत्नागिरी) : मोडकाआगर पुलासह गुहागरपासून रामपूरपर्यंतचे पहिल्या टप्प्यातील तीनपदरीकरण मे महिन्यापूर्वी पूर्ण करा. कोरोना संकटामुळे तुम्हाला मुदतवाढ मिळाली आहे. आता युद्धपातळीवर कामे सुरू करा, अशा सूचना आमदार भास्कर जाधव यांनी ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला केल्या आहेत. आमदार जाधव यांनी थेट मोडकाआगर पुलापर्यंत जाऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली.

हेही वाचा -  २३ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू -

मोडकाआगर पुलाचा विषय गेली तीन वर्षे गाजत आहे. या पुलाचे काम किरकोळ असल्याचे सांगणारे अधिकारी आता पुलाच्या कामाविषयी काही बोलत नाहीत; मात्र गुरुवारी आमदार भास्कर जाधव यांनी थेट मोडकाआगर पूल, पाटपन्हाळे ते मोडकाआगर सुरू असलेले तीन पदरीकरणाचे काम यांची पाहणी केली. त्या वेळी अधिकारी आणि ठेकेदारांना पूल कधी सुरू होणार? असा प्रश्न विचारल्यावर दोघेही निरुत्तर झाले होते.

अखेर ठेकेदाराने पुढील दोन महिन्यात दुचाकी आणि कमी वजनाच्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे उत्तर देऊन वेळ निभावली; मात्र आमदार भास्कर जाधव यांनी अधिकारी आणि ठेकेदारांना आता केवळ सहा महिनेचे तुमच्याकडे आहेत. या कालावधीत गुहागर ते रामपूर रस्त्याचे काम पूर्ण करावे. त्यासाठी गुहागरकडून मोडकाआगरपर्यंतच्या रस्त्याच्या कामालाही सुरवात करावी. मे महिन्यात कोणत्याही परिस्थितीत वाहतूक सुरू झाली पाहिजे, अशी सूचना केली.

हेही वाचा - ग्रामसभा मान्यतेचीच कामे सुचवा ; जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही -

 

मोबदल्याची रक्कम प्रांतांकडे जमा

गुहागर-विजापूर महामार्गाच्या तीनपदरीकरणात गुहागर ते चिपळूणदरम्यानच्या मार्गावरील १७ गावांमधील काही जमीनमालकांची जागा जात आहे. संबंधित जमीनमालकांना अधिग्रहणासंदर्भात नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. या जमीनमालकांना मोबदल्यापोटी द्यावयाची रक्कम ४२.९२ कोटी रुपये हे चिपळूण उपविभागीय कार्यालयाकडे हस्तांतरित झाले आहेत, अशी माहिती प्रभारी प्रांताधिकारी जयराज सूर्यवंशी यांनी या वेळी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhaskar jadhav visit to working of guhagar rampur road in ratnagir asked question to contractor