भास्कर जाधवांच्या भेटीवरून कदमांना तटकरेंनी दिला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

konkan

आम्ही तुमच्यासोबतच, कोणी भडकावलं म्हणून भडकू नका - तटकरे

भास्कर जाधवांच्या भेटीवरून कदमांना तटकरेंनी दिला सल्ला

दाभोळ : दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुका स्वबळावर लढण्याचा आग्रह जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव व माजी आमदार संजय कदम यांनी धरला आहे. स्थानिक पातळीवरचे राजकारण लक्षात घेता व काँग्रेसने केलेली स्वबळाची भाषा पाहता आपण याला संमती देत असून या निवडणुकीत दोन्हीही नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता येईल, असा विश्‍वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. दापोली व गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सोयीसाठी दापोलीमध्ये खासदार तटकरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन राधाकृष्ण मंदिरासमोरील फाटक कॅपिटल या इमारतीमध्ये झाले. या कार्यक्रमानंतर कार्यकर्ता मेळावा झाला. त्यामध्ये तटकरे बोलत होते.

ते म्हणाले, 'दापोली व परिसरात पर्यटनाला खूप चांगल्या पद्धतीने वाव असून राज्याच्या वतीने ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे व सागरी महामार्ग यांचे काम करण्यात येणार आहे. दापोली व मंडणगड परिसरात जन्मलेल्या तीन भारतरत्नांचे एकत्रित स्मारक उभारण्याचा मनोदय आहे. केंद्राच्या सागरमाला योजनेतून हर्णै व परिसरातील लहान मोठ्या बंदरांचा विकास करण्यात येणार आहे. केंद्राकडून कोणत्याही प्रकारे निधीच्या बाबतीत विकासकामांसाठी कमतरता भासणार नाही, याची दक्षता आपण घेत आहोत.'

जाधव-कदम भेटीबाबत तटकरेंचा सल्ला

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांची आमदार भास्कर जाधव यांनी भेट घेतली होती. या भेटीबाबत भास्कर जाधव यांचे नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांनी संजय कदम यांना सल्ला देताना सांगितले, ज्या वेळी तुम्ही पक्षात आलात त्या वेळी आम्ही तुमच्यासोबत आहोत हा शब्द दिला होता. २०१४ च्या निवडणुकीत हा शब्द आम्ही पाळला. २०१९ मध्ये शब्दात बदल झाला नाही पण दुर्दैवाने अपयश आले; मात्र त्यामुळे खचून जाऊ नका आमचा शब्द कायम आहे. कोणी भडकावले म्हणून भडकून जाऊ नका, असा सल्ला तटकरे यांनी देताच सभागृहात हास्य व टाळ्यांचा कडकडाट झाला.