esakal | भवानी तलवार आणि सावंतवाडी संस्थान 

बोलून बातमी शोधा

bhavani talwar sawantwadi sansthan history}

इतिहासाच्या कसोटीवर तो सिद्ध झालेला नाही; मात्र मौखीक परंपरेने हा संदर्भ सांगितला जातो. या संस्थानचे तत्कालीन राजे लखम सावंत आणि त्यांचे पुतणे खेम सावंत (दुसरे) यांच्या कारकीर्दीतील हा संदर्भ आहे. 

भवानी तलवार आणि सावंतवाडी संस्थान 
sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीविषयी अनेक तर्क वितर्क मांडले जातात. ही तलवार महाराजांकडे कशी आली, ती कशी होती, ती आता कुठे आहे? यावर बरेच संदर्भ दिले जातात. याच तलवारीशी संबंधीत एक मौखीक संदर्भ सावंतवाडी संस्थानशी जोडला जातो. ही तलवार सावंतवाडी संस्थानतर्फे शिवाजी महाराजांना भेटीदाखल दिल्याचा हा मौखीक संदर्भ आहे. इतिहासाच्या कसोटीवर तो सिद्ध झालेला नाही; मात्र मौखीक परंपरेने हा संदर्भ सांगितला जातो. या संस्थानचे तत्कालीन राजे लखम सावंत आणि त्यांचे पुतणे खेम सावंत (दुसरे) यांच्या कारकीर्दीतील हा संदर्भ आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या "जगदंबा', "तुळजा' आणि "भवानी' या तलवारीविषयी इतिहासाला नेहमीच औत्सुक्‍य राहिले आहे. यातील "भवानी' तलवार आता नेमकी कुठे आहे? याबाबत अनेक इतिहासकारांनी संशोधन केले. याबाबतचे तर्क वितर्क मांडले. ही तलवार महाराजांना कोणी दिली? या संदर्भातही बरेच प्रवाद आहेत. जुने संदर्भ, बखरीचा आधार घेत याबाबत अनेक अंदाज आतापर्यंत बांधले गेले आहेत. एका मौखीक संदर्भानुसार ही तलवार लखम सावंत यांच्या सत्ताकाळात सावंतवाडी संस्थानचा छत्रपतींशी तह झाला तेव्हा त्यांना भेटीदाखल दिल्याचे सांगितले जाते; मात्र याचा पुरावा कुठेही सापडत नाही. लखम सावंत आणि खेम सावंत (दुसरे) यांचे कर्तृत्व जाणून घेत असताना हाही संदर्भ मांडत आहोत. 

सावंतवाडी संस्थानच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या आणि काही जुन्या जाणत्यांकडून हा मौखीक संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न केला. यानुसार लखम सावंत गादीवर असताना त्यांचे पुतणे खेम सावंत (दुसरे) हेही सोबत असायचे. याचे संदर्भ या आधीही आले आहेत. शिवाजी महाराजांशी सावंतवाडी संस्थानच्या तीन लढाया झाल्या. 1659 मध्ये झालेल्या लढाईत सावंतवाडी संस्थानचा पराभव झाला. यावेळी युद्धचे नेतृत्व करणारे राजे लखम सावंत हे पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांवरही हल्ला केला. शेवटी लखम सावंत आणि शिवाजी महाराजांमध्ये एप्रिल 1659ला पाच कलमी तह झाला. यावेळी भेट म्हणून सावंतवाडी संस्थानमार्फत जी तलवार दिली गेली ती भवानी तलवार असल्याचे सांगण्यात येते. ही तलवार पोर्तुगिज बनावटीची होती. तिला हिरेजडीत मुठ असल्याचे सांगितले जाते. अर्थात ही सर्व माहिती मौखीक स्वरूपाची आहे. ती सिद्ध करणारे पुरावे मिळत नाहीत. 

या भवानी तलवारीबाबत इंद्रजीत सावंत यांच्या "शोध भवानी तलवारी'चा या पुस्तकात अनेक संदर्भ दिले आहेत. यानुसार भवानी तलवार ही स्वतः भवानी मातेने प्रकट होवून महाराजांना दिल्याच्या प्रचलीत आख्यायिकेवर भाष्य केले आहेत. याचे संदर्भ संत कविंद्र परमानंद नेवासकर यांनी लिहिलेल्या "शिवभारत' या संस्कृत ग्रंथात काव्य स्वरूपात मिळत असल्याचे सांगितले जाते; मात्र याचा अर्थ खुद्द भवानी मातेने ती दिली, असा काढणे धाडसाचे ठरेल. हे शिवाजी महाराजांवर स्तुतीपर लिहिलेले काव्य आहे. परमानंद यांच्या काव्यात इतरही दैववादाची उदाहरणे आहेत. त्यामुळे तलवार भवानी मातेने दिली असल्याचे सिद्ध होत नसल्याचे आणि ती एका कवीची कल्पना असल्याचे मत या पुस्तकात मांडले आहे. 

ही तलवार नेमकी कुठून आली याबाबतही बखरीच्या आधारे विविध संदर्भ या पुस्तकातून दिले आहेत. चित्रगुप्ताची बखर, चिटणीस बखर, शिवदिग्विजय बखर यामध्ये भवानी तलवारीचे संदर्भ आढळतात. यात ही तलवार कशी होती या संदर्भातीलही वर्णन आहे. या बखरीमध्ये ही तलवार गोवलेकर सावंत या सरदार घराण्याकडून महाराजांना मिळाल्याचे सांगितले जाते. या बखरींमध्ये "श्री तुळजा फिरंग' असा या तलवारीचा नामोल्लेख आढळतो. चिटणीस बखरीच्या उल्लेखानुसार महाराज कोकणात मोहिमेवर असताना त्यांना गोवलेकर सावंत येवून भेटले. त्यांनी महाराजांना एक तलवार दिली. तिचे नाव भवानी तलवार ठेवल्याचे उल्लेख आढळतो.

यातील गोवले हे गाव महाड (जि. रायगड) या तालुक्‍यात येते. असे असले तरी ही मुळ तलवार पोर्तुगिज बनावटीची आहे. इंद्रजीत सावंतांच्या याच पुस्तकात ही तलवार नेमकी कोठून मिळाली याबाबतचा एक मौखीक संदर्भ सांगितला आहे. यानुसार गोवलेकर सावंत यांच्या सैन्याने बांदा बंदरावर ओहोटीमुळे अडकून पडलेल्या पोर्तुगिज जहाजावर हल्ला केला. हे जहाज भरतीची वाट पाहत थांबले होते. यावर ओग फर्नांडेस नावाचा पोर्तुगिज सेनापती होता. त्याच्याकडे चारफूटी लांब रत्नजडीत मुठीची तलवार होती. या चकमकीमुळे उडालेल्या गोंधळात गोवलेकर सावंत यांच्या हाती ही तलवार सापडली. पुढे ही तलवार या घराण्यातील अंबाजी सावंत यांचे पुत्र कृष्ण सावंत यांनी 7 मार्च 1659ला शिवाजी महाराजांना सप्तकोटीश्‍वर या मंदिरात पुजेला बसले असताना भेटीदाखल दिली. अर्थात हा सुद्धा मौखीख संदर्भ आहे. याचा कोणत्याही बखरीत उल्लेख नाही. यातील सप्तकोटेश्‍वर मंदिर गोव्यात आहे आणि गोवलेकर सावंतांचा उल्लेख असलेले गोवले गाव रायगड जिल्ह्यात येते. 

दरम्यान, सावंतवाडी संस्थानातील मौखीक संदर्भानुसारही 1659 मध्येच ही तलवार शिवरायांना दिल्याचे सांगितले जाते. त्याकाळात सावंतवाडी संस्थानकडे स्वतःचे आरमार होते. बांदा आणि परिसरावर त्या काळात याच संस्थानची सत्ता होती. कृष्ण सावंत हे नाव सावंतवाडी संस्थानच्या इतिहासातही शिवाजी महाराज आणि लखम सावंत यांच्या समकाळात येते; मात्र या उल्लेखातील कृष्ण सावंत हे तिरवडे येथील असल्याचे सांगितले जाते. लखम सावंत आणि शिवाजी महाराज यांच्यात झालेला तह सावंत यांनी पुढे पाळला नाही. यानंतर महाराजांनी कोकणात मोहीम काढून सावंतवाडी संस्थानच्या ताब्यात असलेला रांगणागड जिंकला. तो परत मिळवण्यासाठी लखम सावंत यांनी युद्ध केले; मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. यावेळी महाराजांनी कुडाळ प्रांताच्या देशमुखीची वस्त्रे कृष्ण सावंत यांना दिल्याचे उल्लेख आढळतात. पुढे लखम सावंत यांनी शिवाजी महाराजांशी कुडाळात लढाई करून विजय मिळवला; मात्र कृष्ण सावंत त्यांच्या हाती लागले नाहीत. पुढे लखम सावंत यांनी त्यांना कैद करून ठार केल्याचे संदर्भ सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात आहेत. 

"शोध भवानी तलवारीचा' याच पुस्तकात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिलेल्या प्रस्तावनेत गोवलेकर सावंतांनी छत्रपती शिवरायांना ही तलवार दिल्याचे आणि महाराजांनी त्यांना 300 होन दिल्याचे म्हटले आहे. गोवलेच्या पुढे असलेल्या हरीहरेश्‍वर देवाच्या दर्शनाहून परतताना ही तलवार दिल्याचा संदर्भ यात दिला आहे. सावंतांच्या याच पुस्तकात शिवाजी महाराजांकडे भवानी देवीच्या नावाने असणाऱ्या एक नव्हे तर कमीत कमी तीन तलवारी असाव्यात, अशी शक्‍यताही व्यक्‍त केली आहे. एकूणच भवानी तलवार, छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी संस्थान याचे थेट नाते सांगणारे बखर, इतिहासातील उल्लेख किंवा अन्य कोणतेही पुरावे सध्यातरी उपलब्ध नाहीत. इंद्रजीत सावंत यांनीही आपल्या पुस्तकात तसेच मांडले आहे. असे असले तरी सावंतवाडीमध्ये याबाबतचे मौखीक संदर्भ आजही सांगितले जातात. 

शिवाजी महाराजांची तलवार "सिंधुदुर्गा'त 
सिंधुदुर्ग किल्ल्यावर राजाराम महाराजांनी शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले. यात शिवराजेश्‍वरांची मूर्ती स्थापन करण्यात आली. या मूर्तीच्या समोर एक तलवार आहे. ती शिवाजी महाराजांची असल्याचे "शोध भवानी तलवारीचा' या पुस्तकात म्हटले आहे. ही तलवार मराठा मुठीची आहे. याचे म्यान आजही सुस्थितीत आहे. त्यावर चांदीचा वापर झाला आहे. त्याच्या एका बाजूस गरूड आणि दुसऱ्या बाजूला हनुमंताच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. 

संपादन - राहुल पाटील