सावधान...! कधीही दरडी कोसळतील अशी या घाटाची स्थिती

एकनाथ पवार
बुधवार, 1 जुलै 2020

गेल्या काही वर्षांपासून या घाटरस्त्याची अतिशय नाजूक अवस्था बनत चालल्याचे चित्र आहे. या घाटरस्त्यांच्या 9 किलोमीटरपैकी अडीच किलोमीटरचा रस्ता हा उंच कड्याखाली आहे. त्यातील पाच ठिकाणी कधीही दरडी कोसळतील, अशी शक्‍यता आहे. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कधीही दरडी कोसळतील अशी पाचहून अधिक ठिकाणे आणि रस्ता खचण्याच्या प्रमाणात झालेली वाढ यामुळे भुईबावडा घाट यावर्षीही वाहतुकीस धोकादायक ठरणार आहे. इथे दरडी कोसळण्याबरोबरच रस्ता खचण्याचीही भीती आहे. सध्या हा घाट कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. 

करुळ घाटाला चांगला पर्याय म्हणून भुईबावडा घाटाकडे पाहिले जाते. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील हा घाट साधारणपणे 9 किलोमीटर लांबीचा आहे. या घाटमार्गाने करुळ घाटरस्त्याच्या तुलनेत वाहतूक कमी असली तरी भुईबावडा, पाचल, खारेपाटण परिसरातील अनेक गावे पश्‍चिम महाराष्ट्रात ये-जा करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करतात; परंतु गेल्या काही वर्षांपासून या घाटरस्त्याची अतिशय नाजूक अवस्था बनत चालल्याचे चित्र आहे. या घाटरस्त्यांच्या 9 किलोमीटरपैकी अडीच किलोमीटरचा रस्ता हा उंच कड्याखाली आहे. त्यातील पाच ठिकाणी कधीही दरडी कोसळतील, अशी शक्‍यता आहे. 

या घाटातील रस्त्याचे गेल्यावर्षीच नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती चांगली आहे; परंतु दरडी रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना गेल्या काही वर्षात केलेल्या नाहीत. आठ-दहा वर्षांपूर्वी बोल्डर नेटचा वापर करून रोखण्याचे प्रयत्न केले. त्याचा उपयोगही झाला. नेटमुळे रस्त्यावर थेट दरड कोसळण्याचा धोका संभवत नाही; परंतु त्यानंतर मात्र तशाप्रकारचा प्रयत्न केले गेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम रस्त्यावर कोसळलेली दरड हटविण्यातच धन्यता मानताना दिसत आहे. हा घाटरस्ता खचण्याचे प्रमाण अधिक आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळते त्याठिकाणी रस्ता खचतोच, असे समीकरण आहे. त्याठिकाणी पुनर्बांधणी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. 

गेल्या काही वर्षांत हा घाटरस्ता खचून या मार्गावरील वाहतूक बंद होण्याचे प्रकार वाढले आहेत. एकीकडे दरडी कोसळण्याचा धोका तर दुसरीकडे रस्ता खचण्याचा धोका अशा दुहेरी धोके गृहीत धरून या घाटरस्त्याने वाहनचालकांना प्रवास करावा लागतो. सध्या या घाटात अनेक धोकादायक ठिकाणी क्रॅश बॅरियर्स किवा संरक्षक भिंती उभारण्याची गरज आहे. यावर्षी बांधकाम विभागाने 250 मीटर क्रॅश बॅरियर्स उभी केली आहेत, तर संपूर्ण रस्त्याला सफेद पट्टे मारण्याचे काम पूर्ण केले आहे, परंतु रस्त्यालगतच्या गटारातील मातीचा ढिगारा गेल्यावर्षीपासून जैसे थे आहे. त्यामुळे पाणी गटारांऐवजी रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. हे पाणी ज्याठिकाणाहून दरीत कोसळते त्याठिकाणी रस्ता कोसळण्याची शक्‍यता अधिक असते. तरीदेखील बांधकाम विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहे. दरडी आणि रस्ता खचण्याचा धोका या घाटरस्त्याला कायम असल्यामुळे या घाटरस्त्याने पावसाळी वाहतूक धोकादायक मानली जात आहे. 

कोरोनाचा फटका 
या घाटरस्त्यातील सरक्षंक भिंतीसह विविध कामांसाठी 1 कोटी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या कामांची निविदा प्रकियाही पूर्ण झाली आहे. याशिवाय पूरहानीमधून दोन कामांना मंजुरी आहे; परंतु कोरोनामुळे ही सर्व कामे रखडली आहेत. त्यामुळे कोरोनाचा भुईबावडा घाटरस्त्यालाही फटका बसला आहे. 

सध्या वाहतूक बंदच 
या घाटरस्ता मार्गावर तपासणी नाके नसल्यामुळे लॉकडाउन कालावधीत जिल्ह्याची हद्द ओलांडण्यासाठी या मार्गाचा वापर केला. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानतंर पोलिसांनी या घाटात मातीचा ढिगारा रचून हा मार्ग वाहतुकीस बंद केला. तिथंपासून हा मार्ग वाहतुकीस बंदच आहे. 

दृष्टिक्षेपात भुईबावडा घाट 
- 9 कि.मी लांबीचा घाट 
- अडीच किलोमीटर रस्त्याला दरडीचा धोका 
- रस्ता खचण्याचे प्रमाण अधिक 
- दरडी रोखण्यासाठी बोल्डर नेट वापरण्याची गरज 
- रस्ता खचलेल्या ठिकाणी गॅबियन पद्धतीचे बांधकाम करणे गरजेचे 
- रस्त्याकडेला रिप्लेक्‍टर बसविण्याची आवश्‍यकता 
- ठिसूळ संरक्षक कठड्यांच्या ठिकाणी क्रॅश बॅरियर्सचा अधिक वापर करणे गरजेचे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bhuibawada Ghat dangerous konkan sindhudurg