esakal | शिवसेनेच्या इशाऱ्याला भीक घालणार नाही; भाजपचा पलटवार 
sakal

बोलून बातमी शोधा

Bjp Accept Challenge Of Shivsena Pramod Jathar will Visit Chiplun

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी चिपळूणचा दौरा करून खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. नाणार प्रकल्पासह कोकणातील रखडलेल्या विकासकामासंदर्भात जोरदार निशाणा साधला होता.

शिवसेनेच्या इशाऱ्याला भीक घालणार नाही; भाजपचा पलटवार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - भाजप प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार पुन्हा चिपळूण दौऱ्यावर नक्कीच येणार आहेत. शिवसेनेच्या इशाऱ्याला ते भीक घालणार नाहीत. कोण अडवतो ते आम्ही बघूच, असे प्रत्युत्तर भाजप चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी सेना जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांच्या आव्हानाला दिले. भाजपच्या इशाऱ्याने चिपळुणात येत्या काही दिवसांत भाजप-सेना यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी चिपळूणचा दौरा करून खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. नाणार प्रकल्पासह कोकणातील रखडलेल्या विकासकामासंदर्भात जोरदार निशाणा साधला होता. विनायक राऊत यांना "कर्मदरिद्री-ढ' खासदार अशी उपमा देण्याबरोबरच काही मुद्‌द्‌यांवर त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उत्तर देताना प्रमोद जठार यांनी चिपळुणात येऊनच दाखवावे, शिवसेना काय असते ते दाखवून देऊ, असा इशारा दिला आहे. यावर भाजपचे तालुकाध्यक्ष भोबस्कर यांनीदेखील सेना पदाधिकाऱ्यांच्या या टीकेला जोरदार उत्तर दिले. 

भोबस्कर म्हणाले, भाजप प्रदेश सचिव प्रमोद जठार हे आमचे नेते आहेत. ते 15 दिवसात चिपळूणला येणार आहेत. बघुया, कोण अडवतो ते. भाजप जशास तसे उत्तर देईल. मुंबई - गोवा महामार्गाबाबत परशुराम ते संगमेश्वरपर्यंत पोटमक्तेदारी कोणाकोणाची आहे, शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पोटकामाचे ठेके घेऊन कामाची वाट लावली आहे. याची यादीसुद्धा जिल्हाप्रमुख कदमांनी जाहीर करावी. पेढे-परशुराम येथील जमीन मोबदला हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने लवकरच यावरही तोडगा निघेल. सेना पदाधिकाऱ्यांनी त्याची चिंता करू नये, असा टोला भोबस्करनी लगावला . 

सदानंद चव्हाणांना सेनेनेच पाडले 
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी हॅट्रिक केली तर ते मंत्री होतील. या भीतीपोटी त्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत पराभव केला, असा गंभीर आरोप विनोद भोबस्कर यांनी केला आहे. सेना पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या नेत्यांना आव्हान देऊ नये. गेल्या वर्षभरात पंचायत समितीच्या सभापतींनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत आत्मचिंतन करावे, असे भोबस्कर यांनी सांगितले. 
 

loading image