रत्नागिरीत तीन मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - शिवसेना - भाजप युती झाल्यानंतर जिल्ह्यात एकही जागा भाजपला न दिल्याचे पडसाद खेड - दापोली, चिपळूण - संगमेश्‍वरसह गुहागरमध्ये उमटले. केदार साठे यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला असून, तुषार खेतल यांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. डॉ. विनय नातू उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत.

रत्नागिरी - शिवसेना - भाजप युती झाल्यानंतर जिल्ह्यात एकही जागा भाजपला न दिल्याचे पडसाद खेड - दापोली, चिपळूण - संगमेश्‍वरसह गुहागरमध्ये उमटले. केदार साठे यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला असून, तुषार खेतल यांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे. डॉ. विनय नातू उमेदवारी अर्ज घेऊन गेले आहेत. त्यामुळे भाजपचे हे दबावतंत्र आहे की, त्यांच्या विरोधाची धार शेवटपर्यंत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाल्यानंतर एकही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आलेला नाही. गुहागरची जागा भाजपला मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते; मात्र शिवसेनेने भास्कर जाधव यांना पक्षात घेतल्यामुळे भाजपला पारंपरिक मतदारसंघापासून वंचित राहावे लागले आहे. याठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्‍त केली जात आहे. डॉ. नातू यांनी अर्ज घेतल्यामुळे बंडाचा झेंडा फडकविण्याची तयारी केली की काय अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. तसे झाले तर शिवसेनेच्या भास्कर जाधव यांना अडचणीचा विषय होऊ शकतो. भाजपची मते शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. 

लोकसभा निवडणुकीपासून दापोली-खेड मतदारसंघात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून शिवसेनेला चांगलाच विरोध झाला होता. तो अजूनही कायम आहे. केदार साठेंनी अर्ज भरल्याने शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या ठिकाणी कुणबी समाजाचा उमेदवार स्वतंत्र रिंगणात उतरत असल्याने मागील निवडणुकीप्रमाणेच राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्यासाठीचा मार्ग सुकर होऊ शकतो. चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघातून उमेदवारीसाठी तुषार खेतल गेले वर्षभर काम करीत आहेत. संगमेश्‍वरमध्ये झालेल्या एका बैठकीत खेतल यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. तो राष्ट्रवादीच्या पथ्थ्यावर पडू शकतो. भाजपमधील बंडांच्या झेंड्याने शिवसेना उमेदवारांपुढे तिन्ही मतदारसंघात मतांचे विभाजन टाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP activists target rebellion in three constituencies in Ratnagiri