रस्त्याच्या दुरावस्थेवरून भाजप आक्रमक; वैभववाडीत 26 ला आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. तालुक्‍यातील तळेरे - गगनबावडा, फोंडा - उंबर्डे, भुईबावडा - जांभवडे, खारेपाटण - गगनबावडा या चारही प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

वैभववाडी ( सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील चारही प्रमुख रस्ते खड्डेमय असुन वाहतुकीस अयोग्य आहेत. सातत्याने मागणी करून सुध्दा बांधकाम विभागाने खड्ड्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालुका भाजप आता आक्रमक भुमिका घेण्याचा निर्णय घेतला असुन पक्षामार्फत 26 नोव्हेंबरला तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार नितेश राणे करणार आहेत. 

भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी तहसिलदारांना निवेदन दिले आहे. तालुक्‍यातील तळेरे - गगनबावडा, फोंडा - उंबर्डे, भुईबावडा - जांभवडे, खारेपाटण - गगनबावडा या चारही प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर इतक्‍या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत की त्यावरून वाहतुक करणे जिकरीचे बनले आहे. वाहनचालकांना वाहतुक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक अपघात या खड्ड्यांमुळे घडले आहे. यासंदर्भात सातत्याने बांधकाम विभागाशी संपर्क साधुन पत्रव्यवहार केलेला आहे; परंतु बांधकाम विभागाकडुन कोणताही प्रतिसाद मिळत नसुन रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. या रस्त्यामुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे. 

सतत मागणी करून देखील चारही रस्त्याची डागडुजी न केल्यामुळे भाजप 26 नोव्हेंबरला तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार राणे करणार आहेत. आंदोलनावेळी जर काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा इशारा देखील श्री. काझी यांनी दिला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Aggressive Over Bad Road Conditions Agitation In Vaibhavwadi On 26th