रस्ता, वीज, भुसंपादनासह विविध प्रश्नावरून वैभववाडीत भाजप आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 November 2020

तालुक्‍यातील रस्त्यांविषयी चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकर हेवाळे आल्यानंतर रस्त्यांच्या दुरावस्थेवरून श्री. काझी यांनी त्यांना फटकारले. पाऊस थांबल्यानंतर महिना दीड महिना झाल्यानंतर सुध्दा प्रमुख रस्त्यावरील खड्डे का भरण्यात आले नाहीत

वैभववाडी ( सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील रस्त्यांची दुरावस्था, वाढीव विज बिले, भुसंपादनाशिवाय लघु प्रकल्पाची सुरू असलेली बिनबोभाट कामे यासह विविध विषयावरून भाजप पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निधीअभावी खोळंबलेल्या कामावरून राज्य सरकारचे वाभाडे काढले. येत्या दहा दिवसात आंदोलनातील चर्चेनुसार कार्यवाही झाली नाही तर कार्यालयात घुसुन घेराओ घालण्यात येईल, असा इशारा संतप्त कार्यकर्त्यानी दिला. 

तालुक्‍यातील रस्त्यांची दुरावस्था, वाढीव विजबिलांसह विविध प्रश्‍नांसाठी आज येथील तहसिल कार्यालयासमोर भाजपने ठिय्या आंदोलन केले. यात भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुकाध्यक्ष नासीर काझी, सभापती अक्षता डाफळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, जयेंद्र रावराणे, बाळा हरयाण, राजेंद्र राणे, सुधीर नकाशे, दिगंबर मांजरेकर, हुसेन लांजेकर आदी सहभागी झाले होते. 

तालुक्‍यातील रस्त्यांविषयी चर्चा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंकर हेवाळे आल्यानंतर रस्त्यांच्या दुरावस्थेवरून श्री. काझी यांनी त्यांना फटकारले. पाऊस थांबल्यानंतर महिना दीड महिना झाल्यानंतर सुध्दा प्रमुख रस्त्यावरील खड्डे का भरण्यात आले नाहीत. या रस्त्यामुळे वाहनचालकांना जीव नकोसा झाला आहे. तुम्ही अपघाताची वाट पाहताय का? अशा प्रश्नाचा भडीमार केला.

यावेळी अधिकारी श्री. हेवाळे यांनी थातुरमातुर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला; मात्र भाजपचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भंडावुन सोडले.

आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर उंबर्डे-फोंडा रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू केले; परंतु खड्डे भरण्याचे काम मोजकेच कामगार करीत आहेत. अशा पध्दतीने महिनाभरात सुध्दा खड्डे भरून होणार नाहीत. येत्या आठ ते दहा दिवसांत खड्डे भरून पुर्ण करा अन्यथा तुमच्या कार्यालयात येऊन घेराओ घालु, असा इशारा दिला. 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नियोजित इमारतीवरून देखील बांधकाम विभागाला पदाधिकाऱ्यांनी लक्ष केले. इमारतीसाठी दिलेल्या जागेत बंधाऱ्यांचे कारण बांधकामकडुन पुढे केले जात आहे. दुसरीकडे रस्त्यांपासुन 40 मीटर अंतर सोडण्याची अट घातली जात आहे. त्यामुळे ही इमारत उभी राहण्यात अडथळा निर्माण झाला आहे. यावरून कार्यकर्ते आक्रमक झाले.

नगरपंचायत क्षेत्रापासुन तीन किलोमीटर अंतरापर्यत रस्त्यांपासुन 5 मीटर अंतरावर बांधकाम करता येते, असा शासन निर्णय आहे, असे असताना बांधकाम विभाग अशा पध्दतीने का अडथळे निर्माण करीत आहे असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. 

तालुक्‍यातील लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरू असलेल्या धरणाच्या जागेचे भुसंपादनच झालेले नाही. तरीदेखील ठेकेदाराने सहमतीपत्राच्या आधारे 60 टक्के काम पुर्ण केले आहे. शेतकऱ्यांना अजुनही मोबदला मिळालेला नाही. अनेकांची उत्पन्न देणारी झाडे या धरणाच्या बुडीत क्षेत्रात गेली आहेत.

हा काय प्रकार आहे अशी विचारणा लघुपाटबंधारेच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. यावेळी लपाच्या अधिकाऱ्याने शेतकरी आणि तत्कालीन अधिकाऱ्यांनी आपसात विचारविनिमय करून काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. करूळ येथील शेतकऱ्यांना मोबदला देखील दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून तालुक्‍यात पाच धरणे आहेत. त्यांना मोबदला दिला आहे का असे उलट विचारताच अधिकारी निरूत्तर झाले. 

वाढीव विज बिलावरून विज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना 10 दिवसांचा अल्टीमेटम देत असल्याचे सांगितले. या दहा दिवसात आज झालेल्या चर्चेनुसार कार्यवाही झाली नाही तर कार्यालयात घुसुन घेराओ घालण्यात येईल. या आंदोलनाची कसलीही कल्पना देण्यात येणार नाही. 

सरकारची लायकीच नाही 
रस्त्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना भाजपाचे युवा पदाधिकारी स्वप्निल खानविलकर आक्रमक झाले. खड्डे भरण्याचे काम तातडीने करण्यात यावे कारण नवीन कामे मंजुर करण्याची सरकारची लायकीच नाही, असे आक्रमक वक्तव्य केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Agitation In Vaibhavwadi On Road Electricity Bill Issues