खडसेंनी स्वत: केलेले उद्याेग पहावे ; भाजप नेत्याची टिका

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

रत्नागिरी : “भाजप पक्षात एकाधिकारशाही नाही, भाजप पक्ष खडसेंना जास्त माहिती आहे. त्यामुळे खडसे ज्या पक्षात जात आहेत, तिथं एकाधिकार शाही काय असते ते लवकरच समजेल,” असा खोचक सल्ला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी नाथाभाऊंना दिला.

एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर महाराष्ट्रभरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. तसेच भाजपात एकाधिकारीशाही आहे असा खडसेंनी आरोपही केला होता. त्यांच्या आरोपाला भाजपकडून चोख प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीच्या प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा- कोकण मार्गावर दोन पॅसेंजर गाड्या, एक्सप्रेस गाड्या म्हणून धावणार -

तसेच रत्नागिरीता एका खासगी वाहीनीशी बोलताना प्रसाद लाड यांनी खडसेंचे आरोपही खोडले. ते म्हणाले, खडसेंनी आरोप करताना स्वतः केलेले उद्योग काय होते, त्याचा विचार करावा. खडसेंनी फडणवीसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा खडसेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला आळा घालू शकत नाही. आरोप करणं सोपं असतं, पण ते सिद्ध करणं त्यापेक्षा कठिण आहे. फक्त भाजपावर किंवा पक्षातील एका नेतृत्वावर आरोप करण्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर होऊ नये, अशी अपेक्षा लाड यांनी व्यक्त केली.

खडसेंना मंत्रीपद मिळावं. पण त्याचा उपयोग भाजपवर आरोप करण्यासाठी नसावा. त्यांना पक्षात घेण्याचे ते कारण असू नये. खडसेंचा उपयोग महाराष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रवादीने करावा असा टोलाही लाड यांनी हाणला. खडसे यांनी ज्या पक्षात चाललेत त्या पक्षाचा पुर्व इतिहास आणि पक्षातील एकाधिकार शाही अनुभवावी आणि त्यानंतर जनतेसमोर यावा असे लाड यांनी खडसेना सुचित केले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP state vice president Prasad Lad commented by eknath khadse