esakal | सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकवर BJP चा झेंडा फडकवणार : राजन तेली ; Rajan Teli
sakal

बोलून बातमी शोधा

Rajan Teli

सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकवर BJP चा झेंडा फडकवणार : राजन तेली

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) : जिल्‍हा बँकेची निवडणूक आम्‍ही केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane), माजी मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chawhan) यांच्या माध्यमातून लढवत आहोत. निवडणुकीची रणनिती पूर्ण झाली आहे. लवकरच बँक भाजपच्या ताब्‍यात असेल, असा दावा भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी आज केला.

महाविकास आघाडीने जिल्‍हा बँक निवडणूक बिनविरोध करण्याची घोषणा केली; पण त्‍यांची आधीच जागावाटप पूर्ण केले. त्‍यामुळे आम्‍हीही आता या निवडणुकीत ताकदीने उतरणार आहोत. सहकारात राजकारण असता नये; पण महाविकास आघाडीने जिल्‍हावासियांची दिशाभूल केल्‍याचा आरोपही तेली यांनी केला.

येथील भाजप कार्यालयात तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, "त्‍यामुळे जिल्‍हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमचीही इच्छा होती; मात्र आम्‍हाला विश्‍वासात न घेताच महाविकास आघाडीने जिल्‍हा बँक उमेदवारांचे जागा वाटप निश्‍चित केले. त्‍यामुळे आम्‍ही भाजपच्या माध्यमातून ही निवडणूक लढविणार आहोत. खरं तर महाविकास आघाडीकडूनच जिल्‍हा बँक बिनविरोध होणार असल्‍याची घोषणा करण्यात आली होती; मात्र ही घोषणा म्‍हणजे जनतेची दिशाभूल होती. त्‍यांनी आधीच आपले उमेदवार निश्‍चित केले होते. आता आम्‍ही सहकारातील सर्वांना बरोबर घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्‍वाखाली जिल्‍हा बँकेची निवडणूक लढविणार आहोत. बँकेचे सर्व सभासद, मतदार तसेच शेतकरी या सर्वांना बरोबर घेऊन आम्‍ही काम करणार आहोत."

तेली म्‍हणाले, "केंद्रीय मंत्री राणेंकडे सूक्ष्म, मध्यम उद्योग खाते आहे. या खात्‍याच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग उभारणीसाठी आवश्‍यक असणारे सर्व तांत्रिक व इतर सहकार्य उपलब्‍ध होणार आहे. छोटे मोठे, उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी जिल्‍हा बँक आर्थिक पाठबळ देणार आहे. हीच भूमिका घेऊन आम्‍ही मतदारांपर्यंत पोचत आहोत. भाजपकडे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. त्‍यांच्या पाठबळावर आम्‍ही ही निवडणूक सहज जिंकणार आहोत."

मेडिकल कॉलेजच्या केवळ वल्‍गना

जिल्ह्यातील शासकीय सेवेतील डॉक्‍टर प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत; पण सरकारने त्‍यांना वाऱ्यावर सोडले आहे. शासकीय सेवेतील ४६ पैकी ४३ डॉक्‍टर हे बीएएमएस आणि एबीबीएस आहेत; पण त्‍यांना पगार मिळालेला नाही. मेडिकल कॉलेजच्या वल्गना करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी याबाबत आत्‍मपरीक्षण करण्याची गरज आहे असे तेली म्‍हणाले. पगार होत नसल्‍याने २७ पैकी १६ डॉक्टरांनी परतीचा मार्ग पत्करला आहे. इतरही काही डॉक्‍टर सेवा सोडण्याच्या विचारात आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणण्याच्या घोषणा करणारे सत्ताधारी नेते याप्रश्नी सामाजिक बांधिलकी ठेऊन लक्ष देणार का? असा सवाल तेली यांनी केला.

loading image
go to top