कशासाठी तर बळीराजासाठी! भाजपचे `या` समस्यांवर बोट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीक कर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही, ती पूर्ण करावी.

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप तसेच खतपुरवठा करण्याबाबत भाजपच्यावतीने तहसीलदार प्रविण लोकरे यांना निवेदन देण्यात आले. या मागणीचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन तत्काळ शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. 

निवेदनात म्हटले आहे, की राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे या योजनेच्या बोजवारा उडाला असून पीक कर्जाचे वाटप ठप्प आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस या महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेऊन ताबडतोब पीक कर्जाचे वाटप सुरू करावे तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही, ती पूर्ण करावी. तालुक्‍यात अजूनही खताचा तुटवडा आहे. तत्काळ खते उपलब्ध करुन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. 

यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, ऍड. सुषमा प्रभूखानोलकर, नगरसेवक श्रेया मयेकर, कृपा गिरप, शितल आंगचेकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, जिल्हा चिटणिस निलेश सामंत, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, प्रशांत खानोलकर, तालुका चिटणीस समिर कुडाळकर, युवा मोर्चाचे हितेश धुरी, हेमंत गावडे, भूषण आंगचेकर आदी उपस्थित होते. 

आता कर्जमाफी कमीच 
भाजपच्या काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली होती; परंतु आताच्या कर्जमाफीत ठराविक शेतकऱ्यांनाच माफी मिळाली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणारे कर्जदार शेतकरी प्रोत्साहनपर योजनेपासून वंचित आहेत. त्यांचा नविन कर्जमाफी यादीत समावेश करावा व त्यांना चालू खरिप हंगामासाठी नविन कर्जाची उचल द्यावी. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच मच्छीमारांना अद्यापपर्यंत मागील नुकसान भरपाई मिळाली नाही ती ताबडतोब मिळावी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP's demands loan, fertilizer issue konkan sindhudurg