
केळशी येथील खाडीतून समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणारी बोट उलटली
रत्नागिरीत नौका उलटून एका खलाशाचा मृत्यू, एक बेपत्ता
दाभोळ : दापोली तालुक्यातील केळशी येथील खाडीतून समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाणारी माशाअल्ला नावाची बोट उलटून त्याखाली जाळ्यात अडकून एका खलाशीचा मृत्यू झाला असून एक खलाशी बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - कोकणात विशेष रेल्वे का आली रिकामी ?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार केळशी येथील खाडीतून मासेमारीसाठी काल संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास माशाअल्ला ही बोट 6 खलाशांसह आणि इतर 8 बोटींसह केळशी खाडीतून समुद्रात जात होते. त्यावेळी अचानक मोठी लाट आल्याने बोटीच्या तांडेलाने बोट वाचविण्यासाठी ती वळवीत असताना माशाअल्ला या बोटीवर लाट आपटून ही बोट उलटली. या बोटीवरील मकबूल शेखअली चाऊस बोट मालक, सलाम युसूफ चाऊस, इम्रान अब्बास अल्बा, इब्राहिम आदम खमसे हे चारजण बोटीबाहेर फेकले गेले. त्यांना सोबत असणाऱ्या बोटीवरील खलाशानी मदत करून आपल्या बोटीवर घेतले. तर याच बोटीवरील शादत इब्राहिम बोरकर व गणी इस्माईल खमसे हे उलटलेल्या बोटीखाली अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
हेही वाचा - चिपळूणात अख्खी रात्र त्यांनी काढली जागून ; काय कारण ?
काल रात्री मदतकार्य थांबविण्यात आले होते. आज सकाळी या बोटीतील दोघांचा पुन्हा शोध घेण्याचे काम सुरू असताना, बेपत्ता शादत इब्राहिम बोरकर यांचा मृतदेह सकाळी उलटलेल्या बोटीच्याच जाळ्यात अडकलेल्या स्थितीत सापडला आहे. तर गणी खमसे अद्याप सापडलेले नाहीत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली आहे.
संपादन - स्नेहल कदम
Web Title: Boat Collapse And Ratnagiri One Man Dead And One Not Found
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..