वातावरणात बदल, गुजरातच्या नौकांनी घेतला देवगडचा आश्रय

संतोष कुळकर्णी
Tuesday, 22 September 2020

खराब हवामानामुळे स्थानिक मच्छीमारी नौकांसह बाहेरील राज्यातील मच्छीमारी नौका आश्रयासाठी येथील बंदरात आल्या आहेत.

देवगड (सिंधुदुर्ग) - अचानक बरसलेला पाऊस, तसेच समुद्रातील खराब हवामान यामुळे पुन्हा येथील मच्छीमारी थंडावली आहे. सर्वार्थाने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या येथील देवगड बंदरात गुजरातमधील सुमारे शंभरभर मच्छीमारी नौका आश्रयाला आल्या आहेत. रात्रीपासून किनारपट्टीवर पावसाने जोर धरल्याने मच्छीमारी नौका आश्रयासाठी बंदरात आल्या. त्यामुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली असून नौकांची तपासणी सुरू होती. 

दोन दिवसांपासून किनारपट्टीवर वातावरण खराब आहे. अधूनमधून पाऊस होत आहे. त्यातच रविवारी दुपारपासून वातावरणात एकदमच बदल झाला. आज सकाळपर्यंत 24 तासांत येथे 8 मिलिमीटर (एकूण 3416 मिलिमीटर) इतकी पावसाची नोंद झाली; मात्र आज सकाळी येथे दमदार पावसाच्या सरी कोसळल्या. खराब हवामानामुळे स्थानिक मच्छीमारी नौकांसह बाहेरील राज्यातील मच्छीमारी नौका आश्रयासाठी येथील बंदरात आल्या आहेत.

या नौकांपैकी 83 नौकांची तपासणी झाली आहे. त्यावर एकूण 712 मच्छीमार आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती. सागरी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे यांनी नौकांची तपासणी केली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक नीलेश पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ टेकाळे, महिला पोलिस नाईक अमृता बोराडे उपस्थित होते. मच्छीमारांनी मासेमारीस जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले जात आहे. 

वेगवान वाऱ्याची शक्‍यता 
खराब हवामानामुळे स्थानिक मच्छीमारी धीम्या गतीने सुरू आहे. पावसाळी वातावरणामुळे छोट्या नौकाधारकांनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. येथील बंदरात नौकांची गर्दी झाली होती. किनारपट्टीवर उद्यापर्यंत ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची तसेच काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boats from Gujarat came to Devgad due to bad weather