"नोंदणी नौकांव्यतिरिक्‍त मासेमारीसाठी जाणाऱ्या अन्य नौकांवर कारवाई"

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 September 2020

मत्स्य आयुक्‍त; नेव्ही, कोस्ट गार्ड, सागरी पोलिसांवर जबाबदारी

रत्नागिरी : रिअल क्राफ्ट प्रणालीनुसार मासेमारीसाठी नोंदणी नौकांव्यतिरिक्‍त मासेमारीसाठी जाणाऱ्या अन्य नौकांवर कारवाईचा बडगा उगारावा, असे आदेश मत्स्य आयुक्‍तांनी सहायक मत्स्य विभागाला दिले आहेत.
 

रिअल क्राफ्ट प्रणालीनुसार कोकण विभागात मासेमारीसाठी नोंदणी झालेल्या नोंदणीकृत मासेमारी नौकांची संख्या २८ हजार ७६८ एवढी आहे. मासेमारीसाठी परवाने दिलेल्या नौका १५ हजार ६१२ इतक्‍या दिसून येतात. नोंदणी झालेल्या व प्रत्यक्षात मासेमारी परवाने घेतलेल्या यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या नौकांनी मासेमारी परवाना घेतला नसेल, अशा सर्व नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 

याबाबत सर्व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांनी त्यांचे अधिकार वापरून तत्काळ याबाबतची अंमलबजावणी करावी. मासेमारी परवाना न घेतलेल्या नौका मालकांना अनेकदा संधी देऊनसुद्धा प्रतिसाद प्राप्त न झाल्याने विभागामार्फत एकतर्फी नौकाची नोंदणी रद्द करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. नोंदणी रद्द केलेल्या नौकांची यादी नेव्ही, कोस्ट गार्ड व सागरी पोलिस यांना द्यावी. नोंदणी रद्द झालेल्या नौका समुद्रात मासेमारी करताना आढळल्यास त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. 

हेही वाचा- कोल्हापुरात एका क्लिकवर मिळणार केअर सेंटरचे अपडेट -

या नौकांच्या अनुषंगाने काही गैरप्रकार झाल्यास, अनधिकृत मासेमारी झाल्यास किंवा सुरक्षिततेबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसायांवर सोपवण्यात आली आहे. तसे पत्र मत्स्य आयुक्‍तांकडून पाठविण्यात आले आहे.
 

दृष्टिक्षेपात..
  नोंदणीकृत नौकांची संख्या २८ हजार ७६८ 
  मासेमारीसाठी परवाने नौका १५ हजार ६१२ 
  १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत नौकांना नियम
नोंदणी रद्द झालेल्या नौकांना मासेमारी मज्जाव

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On boats other than boats for fishing Action Orders issued by the Fisheries Commissioner to the Assistant Fisheries Department