पार्थिव दफनाचा वाद चिघळण्याची चिन्हे, ग्रामस्थ अक्रमक

रुपेश हिराप
Sunday, 6 September 2020

नागरिकांनी पत्रकार परिषद घेत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांचा जाहीर निषेध केला. तसेच यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रांताधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दिला. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील माठेवाडा परिसरातील दामोदर भारती मठात मठाधिपती श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव दफन केल्याच्या विषयावर आज स्थानिक आक्रमक झाले. हा वाद पेटण्याची शक्‍यता आहे. माठेवाडा येथील स्थानिकांनी आज 1989च्या न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत आज मृतदेह बाहेर काढण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता "आजारी आहे, औषध घेऊन झोपलो आहे', असे उत्तर दिले. त्यामुळे नागरिकांनी पत्रकार परिषद घेत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांचा जाहीर निषेध केला. तसेच यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास प्रांताधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दिला. 

तत्पूर्वी पालिकेत झालेल्या बैठकीत कायद्याच्या चौकटीत बसून हे पार्थिव बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द नगराध्यक्ष संजू परब यांनी स्थानिकांना दिला. शहरातील माठेवाडा आत्मेश्‍वर तळी शेजारी मठाच्या जागेमध्ये तेथील मठाधिपती श्रीकृष्ण गिरी यांचे पार्थिव दफन केल्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

गिरी कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार पुर्व परंपरेनुसार हे दफन केले आहे; मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार न्यायालयाने 1989 मध्ये दिलेल्या आदेशानुसार पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीने या ठिकाणी मृतदेह दफन करू नये, असे नोटीशीद्वारे कळविले असतानाही त्याठिकाणी केलेला दफनविधी चुकीचा आहे, असे म्हटले होते. गेले आठ दिवस हा वाद धुमसत असताना आज पुन्हा स्थानिक आक्रमक झाले. 

येथील पालिकेमध्ये नगराध्यक्ष परब यांची भेट घेत चर्चा केली. नगराध्यक्ष परब यांनी पालिकेच्या वकिलांसमवेत नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""कोणत्याही परिस्थितीत हे पार्थिव बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मात्र हे सर्व करताना कायद्याच्या चौकटीत राहूनच भूमिका घेणार आहे. न्यायालयाचा आदेश धुडकावून जर कोण मृतदेह दफन करत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा न्यायालयाकडून दाखल झाली पाहिजे. आपण स्थानिक नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार.'' 

दरम्यान, स्थानिकांनी 1989 मध्ये झालेल्या न्यायालयाच्या आधारे प्रांताधिकारी खांडेकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी नागरिकांना टाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी येथील माठेवाडा मंदिरात पत्रकार परिषद घेऊन केला. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, पुंडलीक दळवी, अरुण वझे, देवस्थान कमिटीचे वकील समी ख्वाजा, किरण सिद्धये, बाळकृष्ण चोणकर, देव्या सूर्याजी, दिगंबर माठेकर, सुनील प्रभूकेळुसकर, आशिष कदम, हरिश्‍चंद्र सासोलकर, प्रणील पोकळे, नंदकुमार गावडे, शेखर प्रसादी, प्रवीण राजपुरोहित, देवा टेमकर आदी उपस्थित होते. 

माठेवाडा येथील दामोदर भारती मठात मृतदेह दफन प्रकरणी 1989 मध्ये झालेला न्यायालयाचा आदेश व ते कागदपत्र घेऊन सोमवारी माझी भेट घेण्यासंदर्भात आठ दिवसांपूर्वी स्थानिकांशी चर्चा झाली होती. त्यावेळी नागरिकांनी सोमवारी भेटण्याचे कबुल केले होते; मात्र आज नागरिकांना भेटायचे होते; पंरतु आजारी असल्याने त्यांना भेटलो नाही. 
- सुशांत खांडेकर, प्रांताधिकारी, सावंतवाडी 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Body burial case sawantwadi konkan sindhudurg