धागेदोरे सापडेनात, अनेक आव्हाने तरीही पोलिसांचा कसून तपास

भूषण आरोसकर
Monday, 14 September 2020

मृतदेह बेळगाव, कोल्हापूर परिसरातील जिल्ह्यातून आणला असल्यास त्या गाडीचा शोध घेण्यासाठी आंबोली चेक पोस्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आंबोली घाटामध्ये सापडलेल्या मृतदेहाने पोलिसांसमोर नवनवीन आव्हाने उभी केली आहेत; मात्र या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करण्यात येणार असल्याचे तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक अमित गोते यांनी "सकाळ'ला सांगितले. गोवा, कर्नाटक व राज्यातील इतर जिल्ह्यांमधून बेपत्ता महिलांची माहिती घेण्याचे काम सुरू असून या महिलेचा मृतदेह बेळगाव, कोल्हापूर परिसरातील जिल्ह्यातून आणला असल्यास त्या गाडीचा शोध घेण्यासाठी आंबोली चेक पोस्टवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

चार ते पाच दिवसांपूर्वी गोव्यातून परीक्षा देऊन सांगलीकडे रवाना होणाऱ्या विद्यार्थ्यांना घाटात एका पॉईंटवर सेल्फी काढताना अज्ञात महिलेचा मृतदेह दिसला. याबाबतची कल्पना आंबोली पोलिसांना दिली. तो मृतदेह वर काढण्यात आला. या प्रकरणाचे धागेदोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. 

ही महिला नेमकी कोण? तिचा घातपात झाला आहे का? गुन्हेगार कोण? आदी प्रश्‍न आहेत. महिला पोलिस अधिकारी स्वाती यादव यांच्याकडून या महिलेच्या मृत्यूचा तपास तीन दिवसांपूर्वी पोलिस उपनिरीक्षक गोते यांनी स्वीकारल्यानंतर तातडीने त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेत सर्व बाजूने तपासास सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत गोवा, कर्नाटक आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमधून ज्या ठिकाणाहून ही महिला बेपत्ता असल्याची नोंद आहे. त्यांची माहिती घेऊन ओळख पटविण्याचे काम हाती घेतले आहे 
दुसरीकडे या महिलेच्या कवटीवरून तिच्या चेहऱ्याचे रेखाचित्रही काढण्यात येणार आहे. संबंधित महिलेचा विसेराही राखून ठेवला आहे. ज्यादिवशी हा प्रकार पुढे आला, त्यानंतर घटनास्थळी पोलिसांना पुरावा सापडेल, अशी आशा होती; मात्र घटनास्थळी पुरावा न मिळाल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले. 

...तर तपास महत्त्वाचा 
संबंधित महिलेला जर बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा येथून आजरामार्गे आंबोली घाटात आणले असेल तर याबाबतची नोंद सीसीटीव्ही फुटेजमध्ये नक्कीच झाली असेल, ही गोष्ट तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असल्याने आंबोली घाटात पश्‍चिमेकडून चेकपोस्ट ओलांडून येणाऱ्या गाड्या तपासण्यासाठी आजपासून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी श्री. गोते आंबोली पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. 

सद्यस्थितीत सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे तसेच गोवा, कर्नाटक व महाराष्ट्रातील बेपत्ता महिलांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यानंतर या महिन्यात रेखाचित्रही रेखाटण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नक्कीच मी प्रकरणाचा छडा लावेल. 
- अमित गोते, पोलीस उपनिरीक्षक 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Body case amboli konkan sindhudurg