पार्थिव दफन प्रकरणाचा चेंडू प्रांताधिकाऱ्यांच्या कोर्टात, लवकरच निर्णय शक्य

रुपेश हिराप
Monday, 7 September 2020

1989 मधील न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ वापरून हा निर्णय स्थानिक नागरिकांच्या बाजूने होईल, असा आशावादही नगराध्यक्ष श्री. परब यांनी यावेळी व्यक्त केला. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील माठेवाडा येथील दामोदर भारती मठात श्रीकृष्ण महादेव गिरी यांचा दफन केलेले पार्थिव बाहेर काढण्याबाबत प्रांताधिकारी यांच्या न्यायालयात उद्या (ता.7) सायंकाळपर्यंत निर्णय होणार असल्याचे नगराध्यक्ष संजू परब यांनी नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना स्पष्ट केले. 

1989 मधील न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ वापरून हा निर्णय स्थानिक नागरिकांच्या बाजूने होईल, असा आशावादही नगराध्यक्ष श्री. परब यांनी यावेळी व्यक्त केला. येथील माठेवाड्यातील दामोदर भारती मठाचे पुजारी श्रीकृष्ण महादेव गिरी यांचे मागील शनिवारी निधन झाले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मठातच दफन करण्यात आला. यावरून शेजारील नागरिकांनी प्रांताधिकारी, पोलिस, मुख्याधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीवर निर्णय झाला नसल्याने नगराध्यक्ष परब यांनी पुढाकार घेऊन याबाबत आज अधिकारी व नागरिकांची बैठक आयोजित केली होती. 

यावेळी नायब तहसीलदार प्रदीप पवार, मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस उपनिरीक्षक अण्णासो बाबर, पालिकेचे वकील ऍड. पी. डी. देसाई, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ऍड. समी ख्वॉंजा, नगरसेविका शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, नगरसेवक आनंद नेवगी, नारायण वझे, किरण सिद्धये, पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर, बाळकृष्ण चोणकर, गणेश पेंढारकर, नंदू गावडे, अमेय मोघे, विराग मडकईकर, हनुमंत घाटे, कुणाल सावंत, विठ्ठल दळवी, भूषण कुलकर्णी, अजय गोंधावळे, बंटी पुरोहित, रघुनाथ खोटलेकर, विष्णू बांदेकर तसेच नागरिक उपस्थित होते. 

पुंडलिक दळवी व बाळ चोणकर म्हणाले, ""श्रीकृष्ण गिरी यांचा मृतदेह दफन करण्यात आला त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. या पोलीस संरक्षणामध्ये दफन केलेल्या ठिकाणी समाधी बांधण्याचा प्रयत्न झाला आहे हे योग्य नाही.'' यावर पोलीस उपनिरीक्षक बाबर म्हणाले, ""आम्ही या ठिकाणी पोलिस संरक्षण ठेवताना मृतदेह बाहेर काढला जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी पोलिस संरक्षण ठेवलेले आहेत.'' पोलिसांच्या एकूणच भुमिकेवरुन उपस्थित नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीत नारायण ऊर्फ अरूण वझे, गणेश पेंढारकर, पुंडलिक दळवी, देवा टेमकर, किरण सिद्धये, आनंद नेवगी यांनी चर्चेत भाग घेतला. पालिका ऍड. देसाई, देवस्थान समितीचे ऍड. ख्वॉंजा यांनी देखील मार्गदर्शन केले. पोलिस हवालदार सतीश कविटकर यांनी पोलिसांची भुमिका मांडली. 

शांततेच्या मार्गाने जावे 
यावेळी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत नगराध्यक्ष म्हणाले, की श्रीकृष्ण गिरी यांचा मृतदेह दफन करण्यात आला आहे. त्याबाबत प्रांताधिकारी उद्या (ता.7) सायंकाळपर्यंत निर्णय घेतील. त्यानंतर पुढील भूमिका घेणे योग्य ठरेल. मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी निर्णय दिला होता, त्याआधारे याविषयी निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. याशिवाय शांततेच्या मार्गाने या प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Body case issue sawantwadi konkan sindhudurg