बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी हाती

अजय सावंत
Wednesday, 30 September 2020

आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली. 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - पावशी धरणात काल (ता.28) सायंकाळी पोहण्यासाठी गेलेल्या अभिषेक दळवी (वय 21) या युवकाचा मृतदेह आज दुपारी सापडला. काल रात्री साडेआठपर्यंत शोध घेऊनही त्याचा शोध लागला नव्हता. आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळाले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सरपंच बाळा कोरगावकर यांनी व्यक्त केली. 

पावशी धरणवाडी येथील अभिषेक हा युवक मित्रांसमवेत काल (ता.28) सायंकाळी पावशी धरणवाडी येथील धरणात पोहण्यास गेला होता. तलाव पावसाने पूर्ण भरलेला असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याची पातळी खोलवर होती. अलीकडेच हा युवक कधीतरी पोहण्यासाठी जात असे.

काल सायंकाळी तो बुडाल्याचे समजताच पावशी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन त्याचा शोध घेतला. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, सरपंच बाळा कोरगावकर, माजी सभपती राजन जाधव, पप्या तवटे, उपसरपंच दीपक आगणे यांनी भेट दिली. येथील पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री 8.30 पर्यंत शोध मोहीम सुरू होती. काळोख झाल्याने शोधमोहिम थांबविण्यात आली. आज मालवण येथील स्कुबा डायव्हिंग दाखल झाले होते. त्यांनी होडीतून शोध मोहीम सुरू केली असता त्याचा मृतदेह आढळला. 

आपत्कालीन यंत्रणेबाबत संताप 
ज्यावेळी काल सायंकाळी शोधमोहीम सुरू असताना आपत्कालीन यंत्रणेचे सहकार्य मिळावे, अशी मागणी करण्यात आली; मात्र या मागणीला सहकार्य मिळाले नाही. याबाबत सरपंच बाळा कोरगावकर यांनी संताप व्यक्त केला. अभिषेकची घरची परिस्थिती हलाखीची असून एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्‍चात आई आहे. त्याच्या जाण्याने दळवी कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of a drowned youth was found