बोली भाषेतील अस्सल कोकणी लोकगीते अशी आली मुख्य प्रवाहात 

शिरीष दामले
Wednesday, 26 February 2020

डीबीजे महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापकांनी चार वर्षांपूर्वी मोहीम सुरू केली. आता मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प म्हणूनही त्याला शैक्षणिक शास्त्रीय बैठक देण्यात आली आहे.

रत्नागिरी - बोली भाषा टिकल्या तरच प्रमाणभाषा वृद्धिंगत होते, बोलीभाषेतील प्रवाह येऊन मिसळले की ती समृद्ध, प्रवाही होते. ही बाब लक्षात घेऊन भाषा संपन्न होण्यासाठी चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या मराठी विभागाने कोकणी लोकगीते संकलन करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामधून जुन्या चालीरिती, भाषेतील खुमारी, अस्सल कोकणी ठसका असलेली भाषा आणि अस्खलित स्वरूपातील गीते हाती लागली आहेत. 

डीबीजे महाविद्यालयातील मराठीच्या प्राध्यापकांनी चार वर्षांपूर्वी मोहीम सुरू केली. आता मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प म्हणूनही त्याला शैक्षणिक शास्त्रीय बैठक देण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे 250 हून अधिक लोकगीते जमा करण्यात आली आहेत. यातील बरीचशी संक्रमित झालेली म्हणजेच मूळ स्वरूपाला दुरावलेली आहेत.भातलावणीच्या वेळी म्हटली जाणारी 64 अस्खलित गीते हाती लागली. याचे अस्सलपण ओळखण्यासाठी बोलीभाषेचा गीतात किती प्रमाणात वापर, त्याची चाल, गाण्याचा विशिष्ट बाज, त्यामध्ये आधुनिकतेचे कोणतेही प्रतिबिंब नसणे आणि गावगाडा जाणवणे याचा वापर करता येतो. 

ऐतिहासिक भाषा विज्ञान पद्धती वापरता येते. हा अभ्यास चिपळूण तालुक्‍यातील बोलींबाबत मर्यादित आहे. कुणबी समाजाची, कातकरी समाजाची ओळखता येतील अशी गीते त्यात आहेत. त्यामध्ये अध्यात्म, जीवनाचे तत्वज्ञान, व्यावहारिकता , हरवत चाललेल्या संस्कृतीचे चित्रणही आहे. प्राधान्याने ही गीते महिलांची व महिलांकडून मौखिक परंपरेने आली आहेत. 

मराठी भाषेच्या आपल्या परिसरातील बोली विसरल्या न जाता त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डीबीजे महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख आर. के. दवणे, प्रा. ब्रह्मे, प्रा. विनायक बांद्रे आणि प्रा. पांडे सारे मिळून काम करत आहे. 

गीतांचे ध्वनीमुद्रण  

विद्यार्थ्यांनी कोळी गीते अथवा लग्नातील हळदीच्या वेळची गीते तसेच काजू बी भाजताना महिला गातात ती गीते जमवली आहेत. त्याचे ध्वनीमुद्रण केले आहे. बुजुर्गांच्या त्या बाबतीतील भावनाचीही नोंद केली आहे. मुस्लीम समाजात विविध प्रसंगांची गाणी आजही गायली जातात. त्यांच्याकडून हा ठेवा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

""गावगाडा आणि लोकसंस्कृती याचे प्रतिबिंब अशा गाण्यांमध्ये पडते. सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनेही यांचे मोल मोठे आहे. संगमेश्‍वरी बाजसारख्या बोली भाषेतील लोककलेचा प्रयोग भाषा आणि संस्कृतीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे.'' 
- प्रा. आर. के. दवणे 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boli Bhasha Lokgite Comes In Main Stream Ratnagiri Marathi News