
मंडणगड (रत्नागिरी) : चार किलोमीटर अंतरावर असूनही बारमाही वाहणाऱ्या भारजा नदीपात्रामुळे आतले व तोंडली गावांना असुविधांना सामोरे जावे लागत आहे. पुलाची मागणी झाली, मोजणी झाली. मात्र, शेवटी आश्वासनाशिवाय काहीच झाले नाही. अखेर दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित श्रमदानाचा पर्याय निवडत लोकवर्गणी काढून भारजा नदीवर पूल बांधला. आठवड्याच्या अथक मेहनतीने पुलावरून पहिली रिक्षा धावल्याने झालेला आनंद अवर्णनीय होता.
आतले व तोंडली या गावांची नातेसंबंध, सामाजिक, शैक्षणिक दृष्टीकोनातून नाळ जोडली आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असताना ही गावे रस्त्यापासून वंचित होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या परंतु नदीमुळे विभागलेल्या या दोन्ही गावांना प्रतीक्षा आहे ती गाडी मार्गाची. निवडणुकीत आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. शासन दरबारी पाठपुरावा करून केवळ आतले ते भारजा नदीपर्यंत व भारजा नदी ते तोंडली गावापर्यंत कच्चा रस्ता झाला होता. मात्र या दोन्हीच्या मध्ये ७५ मीटर अंतराचे नदीचे पात्र. त्या नदीवर पूल बांधण्यासाठी शासनाकडून मोजणी झाली.
सात कोटींचे बजेट असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले. पण पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी बैठका घेतल्या आणि श्रमदान व लोकवर्गणीतून रस्ता करण्याचा निर्णय झाला. संत गाडगेबाबांच्या जयंतीला श्रमदानाला सुरवात झाली. शेकडो हात राबू लागले. जेसीबीच्या साहाय्याने खराब रस्ता मोकळा करून तयार करण्यात आला. नदीत दोन मोऱ्या टाकून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यात आला. दगड, माती, धोंडे भराव टाकून पूल तयार झाला. या पुलावरून आतले ते तोंडली या दोन गावा दरम्यान पहिली रिक्षा गाडी धावली. गावाच्या मंडळांनी लोकवर्गणी काढून खर्च केला.
पुलामुळे ४५ किलोमीटरचे अंतर कमी
या रस्त्याची गरज केवळ या दोन्ही गावांची नसून, या रस्त्यामुळे परिसरातील ५० पेक्षा अधिक गावांना त्याचा फायदा होणार आहे. दापोली-खेड-रत्नागिरी अंतर कमी होईल. पर्यटनास चालना मिळून रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे शासनाने या सर्व बाबतीत विचार करून या परिसरातील नागरिकांची रस्त्याची व नदीवरील कायमस्वरूपी पुलाची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी आतले व तोंडली ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.
"तोंडली गावाने प्रोत्साहित केल्याने बैठकीद्वारे दोन्ही गावांची एकजूट झाली. ‘साथी हात बढाना है... मिलकर बोज उठाना है’ म्हणत खांद्याला खांदा लावून परिश्रम करण्यात आले. लहान मुलांपासून वयोवृद्ध ग्रामस्थ, महिलांनी काम केले. आता तरी आमची समस्या सोडवा."
- सखाराम म्हाब्दी, ज्येष्ठ ग्रामस्थ, आतले
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.