रत्नागिरी : केमसे जलसाठा फुटल्याने अकरा कुटुंबांच्या जगण्याची दैना

रत्नागिरी : केमसे जलसाठा फुटल्याने अकरा कुटुंबांच्या जगण्याची दैना

चिपळूण - वीस दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कुंभार्ली घाटालगत असलेल्या सह्याद्री खोऱ्यातील केमसे परिसरातील मातीचे बांधकाम असलेला खासगी जलसाठा फुटला. त्याखालाेखाल असलेल्या दुसऱ्याही साठ्यास गळती लागली आहे. या घटनेमुळे भाटपाडा येथील धनगरवाडीतील ११ कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. विविध सामाजिक सेवाभावी संस्थांनी येथील कुुटुंबांना मदत केली असून अजूनही मदतीचा ओघ सुरूच आहे. 

तालुक्‍यासह सह्याद्री खोऱ्यात ४ ते ८ ऑगस्टदरम्यान अतिवृष्टी झाली. परिणामी शहरात तीन दिवस पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याच कालावधीत सह्याद्री खोऱ्यातील केमसे भागातील जलसाठा फुटला. सुमारे ५० ते ७० एकराच्या परिसरात एका खासगी मालकाने मातीची दोन धरणे उभारली आहेत. पाण्याच्या प्रचंड दाबामुळे यातील एक धरण फुटले. परिणामी मातीचा भराव मोठ्या प्रमाणात खाली आला. धरणाच्या वरील बाजूस धनगरवाडीत ११ कुटुंबे राहतात. तालुक्‍यातील गळसर गावापासून ही धनगरवाडी जवळ आहे.

वाडीतून खाली येणाऱ्या रस्त्यावर धरणाची माती आल्याने ग्रामस्थांचा रहदारीचा रस्ता बंद झाला. त्यामुळे तीन ते चार दिवस ग्रामस्थ उपाशी राहिले. निसरड्या रस्त्यावरून खाली येताना काही ग्रामस्थ पडल्याने त्यांना दुखापत झाली. त्यातूनही दोन ते तीन ग्रामस्थ सह्याद्री खोऱ्यातील एका कड्यावरून उतरून शिरगाव बाजारपेठेत थांबले होते. सामाजिक सेवाभावी संस्था कार्यकर्त्यांना या लोकांची माहिती मिळाल्यानंतर मदतकार्यास सुरवात झाली.

निरंतर कोकण कृती समिती, सॅक्रो संस्थेचे कार्यकर्ते तसेच चिपळूण व गुहागर तालुक्‍यातील कार्यकर्ते जीवनावश्‍यक वस्तूंचे किट घेऊन घटनास्थळी पोचले. घटनास्थळी जातानाही अनंत अडचणी होत्या. मार्गावर माती असल्याने दोन ते तीन फूट खोल पाय रुतत होते. यातूनही हे कार्यकर्ते वस्तू घेऊन घटनास्थळी पोचले. विविध वस्तू ठेवण्यासाठी त्यांना डबेही दिले. अतिवृष्टीत घरांचे नुकसान झाल्याने धनगरवाडीतील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, धरण फुटल्यानंतर चिखलाचे पाणी पोफळीतील शेतकऱ्यांच्या भात शेतीत घुसले. मोठ-मोठ्या झाडांचे ओंडकेही नदीत आणि शेतात आले होते. यामुळे शेतीचेही नुकसान झाले आहे. 

बाधित लोकांना गरजेच्या गोष्टी
तांदूळ, डाळी, पीठ, कडधान्ये, बिस्किटे, चहा पावडर, साखर, किराणा साहित्य, चादर, ब्लॅंकेट, ताडपत्री, दोरी, लहान मुलांना चपला, कपडे व शालेय साहित्य, मोठ्या लोकांना चपला, कपडे, औषध यासह किमान ११ सौर दिव्यांची नितांत गरज आहे.

सिव्हिलाईज्ड झालेले नागरिक आजही भटक्‍या जाती आणि फिरस्तीवर उदरनिर्वाह करणाऱ्या समुहांना माणूस मानत नाहीत. भाटी धनगर पाडा जरी चिपळूण तालुक्‍यात येत असला, तरी येण्या-जाण्याचा मार्ग केडशी या कोयनेतील गावांच्या डोंगर पायवाटेवरून प्रवास करावा लागतो, महत्त्वाची शहरं पाण्याखाली गेल्यावर त्याचा गवगवा होतो. दुर्गम भागात झालेल्या आपत्तीबद्दल मात्र जिल्हावासीयदेखील अनभिज्ञ असतात.
-पंकज दळवी,
अध्यक्ष, निरंतर कोकण कृती समिती.

अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान
सह्याद्री खोऱ्यातील केमसे परिसरात अतिवृष्टीने लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लहानग्यांपासून मोठ्या व्यक्ती व जनावरांचे खाण्या- पिण्याचे हाल झाले. मुख्य वाटेवर बांधण्यात आलेला बंधारा फुटल्याने वाटच बंद झाली. गावाशी संपर्क तुटला. सह्याद्रीच्या माथ्यावरून कोकणात येण्यासाठी तीव्र उताराच्या निसरड्या पायवाटेने यावे लागते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com