esakal | कणकवली उड्डाणपूल महिना अखेरीस खुला 

बोलून बातमी शोधा

breeze start soon kankavli konkan sindhudurg}

याखेरीज पुलाची मजबुतता तपासण्यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात चार तास ट्रायल रनसाठी उड्डाणपूल खुला केला जात आहे. 

kokan
कणकवली उड्डाणपूल महिना अखेरीस खुला 
sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवली शहरातील 1200 मिटरचा उड्डाणपूल फेब्रुवारी अखेरीस वाहतुकीस खुला होणार आहे. सध्याच पुलाचे काम पूर्ण झाले असून रंगरंगोटी आणि कोसळलेल्या बॉक्‍सवेल भिंतीच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले आहे. याखेरीज पुलाची मजबुतता तपासण्यासाठी रोज सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात चार तास ट्रायल रनसाठी उड्डाणपूल खुला केला जात आहे. 

महामार्ग चौपदरीकरण आराखड्यात कणकवली शहरात बॉक्‍सवेल ब्रीजचा समावेश केला होता; मात्र बॉक्‍सवेलमुळे शहराचे दोन भाग होणार होते. त्यामुळे बॉक्‍सवेलला शहरात विरोध झाला. त्यानंतर शहरात एस. एम. हायस्कूल ते नरडवे तिठा या दरम्यान बाराशे मिटरचा उड्डाणपूल मंजूर करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून या पुलाची उभारणी सुरू होती. कोरोना प्रादुर्भाव कालावधीत पुलाचे काम सहा महिने रेंगाळले. त्यानंतर आता फेब्रुवारी 2021 अखेरीस हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला जाणार असल्याची माहिती दिलीप बिल्डकॉन प्रतिनिधीकडून देण्यात आली. 

गतवर्षीच्या पावसाळ्यात एस.एस.हायस्कूल नजीक उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्‍सवेलची भिंत दोन वेळा कोसळली होती. त्यामुळे जानवली पुलापर्यंतची बॉक्‍सवेल भिंत काढून तेथे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी शहरवासीयांनी केली. तर महामार्ग प्राधिकरणने 60 कोटींचा प्रस्ताव देखील केंद्राकडे पाठवला. मात्र या प्रस्तावाला मंजूरी मिळाली नसल्याने अखेर कोसळलेल्या बॉक्‍सवेल भिंतीची डागडुजी केली जात आहे. येत्या आठ दिवसांत हे डागडुजीचे काम पूर्ण होणार आहे. 

उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या पुलावरून अवजड वाहने नेऊन सुरक्षितता तपासण्यात आली. त्यानंतर सध्या दररोज सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात हा पुल वाहतुकीसाठी खुला केला जात आहे. यात वाहनांचे होणारे संभाव्य अपघात आणि त्यावरील उपाययोजना याबाबतची नोंद घेतली जात आहे. कोसळलेल्या बॉक्‍सवेल भिंतीच्या ठिकाणीही संरक्षक कठडे तयार बसविण्याचे काम हायवे ठेकेदार कंपनीने सुरू केले आहे. 

दीड मिनिटांत कणकवली बाहेर 
उड्डाणपूल खुला झाल्यानंतर सध्या शहर तसेच परिसरातील अनेक दुचाकी, चारचाकी वाहन चालकांकडून उड्डाणपूल पाहण्याचा आनंद लुटला जात आहे. याखेरीज जानवली नदीपासून सुरू होऊन गडनदीपर्यंत संपणारा दीड किलोमिटरचा उड्डाणपूल आणि बॉक्‍सवेल भिंत पार करण्यासाठी अवघ्या दीड ते दोन मिनिटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न बऱ्यापैकी निकाली निघणार आहे. 

कणकवली दशक्रोशीपुरतीच मर्यादित राहणार? 
महामार्गावरून मुंबई ते गोवा अंतर पार करताना जानवलीहून निघालेले वाहन वागदेपर्यंत जाईस्तोवर कणकवली कुठे आहे हेच समजत नसल्याची प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी, वाहन चालकांनी व्यक्‍त केली. त्यामुळे पुढील काळात कणकवली दशक्रोशीतील पुरतीच मर्यादित राहणार का? असाही प्रश्‍न असून महामार्गावरील कणकवलीतील प्रसिद्ध ठिकाणांचीही ओळख पुसली जाण्याची खंत शहरवासीयांतून व्यक्‍त झाली. 

संपादन - राहुल पाटील