सुखद! कुडाळ - पावशीचे ऋणानुबंध पुन्हा दृढ, काय आहे कारण?

अजय सावंत
शुक्रवार, 10 जुलै 2020

अर्धवट काम, चार वर्षे झाले तरी काम पूर्ण नाही, आता होणे कठीण, असा लोकांतून सूर उमटत होता. 4 कोटींचे काम झाले उर्वरित होणार की नाही, असे चित्र निर्माण होत असताना कोरोनाचे संकट आले.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - कुडाळ व पावशीचे ऋणानुबंध जोडणारा चार वर्षे खितपत पडलेला 4 कोटी 82 लाखांचा भंगसाळ नदीवरील बंधारा जूनमध्येच पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. पालकमंत्री, खासदार, आमदार तसेच लघु पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांचे पावशी ग्रामपंचायतीने आभार मानले. 

कुडाळ व पावशी हे दोन गावे जोडणाऱ्या भंगसाळ नदीवरील बंधारा चार वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यामुळे या पुलामुळे दोन्ही गावांचा तसेच या पुलावरून जाणाऱ्या अन्य गावातील लोकांचा जवळचा मार्ग बंद झाला होता. लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने हा बंधारा होण्यासाठी पाठपुरावा केला. बंधारा होण्यासाठी अनेक अडथळे होते; मात्र हे सर्व अडथळे दूर करून बंधारा होण्यासाठी खासदार व आमदार यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

अर्धवट काम, चार वर्षे झाले तरी काम पूर्ण नाही, आता होणे कठीण, असा लोकांतून सूर उमटत होता. 4 कोटींचे काम झाले उर्वरित होणार की नाही, असे चित्र निर्माण होत असताना कोरोनाचे संकट आले. अशावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे हा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर त्यांनी लघु पाटबंधारे विभागाला आदेश देऊन हे उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे, असा आदेश दिला.

हा बंधारा होण्यासाठी पालकमंत्री सामंत, खासदार राऊत, आमदार नाईक यांनी फार मोठे काम करून पावशीवासीयांचा विश्‍वास संपादन केला. यासाठी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, माजी सभापती राजन जाधव, सरपंच बाळा कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांचा पाठपुरावा सुरूच होता. अखेर या बंधाऱ्याला यश येऊन जूनच्या पहिल्या आठवड्यात हा बंधारा पूर्ण झाला. 

खासदार राऊत, पालकमंत्री सामंत, आमदार नाईक यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी शासकीय लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता सौ. पाटील, संतोष कविटकर, श्री. जोशी यांच्या सततच्या प्रयत्नाने पावशी व कुडाळचे ऋणानुबंध पुन्हा जुळून आले. 

दिलेला शब्द पूर्ण 
यंदा काम पूर्ण होण्याची आशा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मावळली होती; परंतु त्यासाठी पालकमंत्री सामंत, आमदार नाईक आदींनी या ठिकाणापर्यंत पोचून पावशीवासीयांना शब्द दिला होता, की "कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यात या रस्त्याने आपणास कुडाळला जाता येईल. ही जबाबदारी माझी असेल', असे सागितले होते. त्याचा पाठपुरावा करत त्यांनी दिलेले वचन पूर्ण केले. जिल्हा परिषद सदस्य सावंत, राजन जाधव, सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे आदींनी आभार मानले. 

पदाधिकाऱ्यांचा सत्कार 
लघु पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी या सर्व लोकप्रतिनिधींचा शब्द पाळण्यासाठी सततचा केलेला प्रयत्न लक्षात घेऊन व तेथील स्थानिक असणारे लेबर कंत्राटी हर्षद काळप यांची अचानकपणे मदत घेऊन पूर्ण केलेल्या कामाबद्दल पावशीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सावंत, सरपंच कोरगावकर, उपसरपंच आंगणे, प्रसाद शेलटे, गणेश वायंगणकर, प्रसाद तवटे, ग्रामविस्तार अधिकारी सरिता धामापूरकर, ग्रामस्थ उपस्थित होते. 

संपादन ः राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bridge work completed kudal-pavshi konkan sindhudurg