ब्रिटीशकालीन काम अन् आताच्या कामाची होतेय तुलना, कारण...

उत्तम सावंत
Monday, 7 September 2020

सध्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असला तरी सुरवातीपासून आजपर्यंत तक्रारी, वाद, आंदोलन, आरोप प्रत्यारोप आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कामाचा दर्जा या भोवतीच चक्र फिरत आहे

नांदगाव (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण दर्जाहीन कामामुळे चर्चेत आले आहे; मात्र ब्रिटीश काळात झालेले याच मार्गावरील पूल आणि कठडे आजही सुस्थितीत आहेत. यामुळे आधुनिक काळातील या कामाची याच्याशी तुलना होवू लागली आहे. 

सध्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असला तरी सुरवातीपासून आजपर्यंत तक्रारी, वाद, आंदोलन, आरोप प्रत्यारोप आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कामाचा दर्जा या भोवतीच चक्र फिरत आहे. नवीन मार्गाला तडे जाणे, रस्ता खचणे, सेवा रस्ता अशातच काम सुरू असतानाच कणकवलीत पुलाचे बांधकाम कोसळल्याने अशा पुलांची आयुष्य मर्यादा किती असेल? याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.

त्या तुलनेत विचार केल्यास ब्रिटिशकालीन म्हणजे 1941 किंवा त्यानंतरची पुले दगड, चुना आदी त्याकाळी उपलब्ध साहित्याचा वापर करून उभी केली होती. त्याची प्रकृती अजूनही ठणठणीत होती; मात्र आत्ताची बांधकामे ढासळतात. तीही अत्याधुनिक यंत्रसामग्री असताना मग नक्की काय म्हणाव? 

तक्रारी संपेनात 
चौपदरीकरणाच्या कामातील महत्त्वाचा भाग म्हणजे या मार्गावरील फ्लाय ओव्हर ब्रीज, भलेमोठे पिलर, संरक्षण कठडे, चकाचक भिंती, सिमेंटचा गुळगुळीत मुलामा, कित्येक टन स्टील, पदवीधारक अभियंता, ज्युनिअर, सिनियर, लेबर अशा लवाजम्यासह काम सुरू आहे. कोटी-कोटी निधी ओतला गेला; मात्र सुरवातीपासून आजपर्यंत तक्रारी काही संपत नाहीत. प्रत्येकवेळी कामाच्या दर्जाबाबत वाद होताना दिसले. नागरिकांना खरी माहिती आजपर्यंत मिळालीच नाही. 

असेही कौशल्य 
दरम्यान, साधारण 1934 सालापासून काळा आणि जांभा दगड वापरून पुलांचे बांधकाम होत गेले. एकात एक दगड, असे माळेप्रमाणे गुंफून शिवाय याच दगडात दगडाचीच चावी बनविली होती. तो चावीचा दगड काढल्याशिवाय इतर दगड काढू शकत नव्हते, असे सांगण्यात येते. तरीही ती मजबूत होती. 

पूर्वीचे पूल अरुंद 
ब्रिटिशकालीन पूल खूप अरुंद होती. दोन अवजड वाहने एकाचवेळी जाऊ शकत नव्हती. त्याच तुलनेत आत्ताच्या पुलांची रुंदी असल्याने पुलावरील अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल; मात्र पुलावरील रस्ता आणि पुढील रस्ता यांच्यात एकजीव व पातळी उंचसखल असल्याने दुचाकी वाहनास धोकादायक असल्याचाही मतप्रवाह आहे. 

नवा पूल चकाचक दिसतो; मात्र दर्जाबाबत नेहमीच प्रश्‍न निर्माण झाले आहेत. त्यामुळे या पुलांची आयुष्य मर्यादा किती? याची शाश्‍वती नाही. त्या तुलनेत जुन्या पुलांचे काम दर्जेदार वाटते. आता छोट्या पुलांची कामे खूप घाईगडबडीत आटोपली जात आहेत. त्याचे तज्ज्ञ मंडळींकडून निरीक्षण व्हायला हवे. 
- पंढरी वायंगणकर, सरपंच, असलदे 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bridge work issue kankavli konkan sindhudurg