सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; ब्रिटिशांना फिरणेही बनले असुरक्षित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sindhudug

सिंधुदुर्गाच्या पाऊलखुणा; ब्रिटिशांना फिरणेही बनले असुरक्षित

बंडाचे स्वरूप तीव्र होण्याबरोबरच ब्रिटिशांची डोकेदुखीही वाढली. बंडाची थेट झळ ब्रिटिश अधिकाऱ्‍यांना बसू लागल्याची जाणीव डेगवे येथे त्यांच्या एका तरुण अंमलदारावर झालेल्या हल्ल्यानंतर ठळक झाली. यानंतर बंड मोडून काढण्यासाठी लष्करी हालचालींना वेग आला. १४ जानेवारी १८४५ ला ब्रिटिशांनी सावंतवाडी संस्थानात लष्करी कायदा लागू केला. यानंतर बंडाची तीव्रता मात्र आणखी वाढत गेली.

हेही वाचा: लखमीपूर तपास अपेक्षेप्रमाणे नाही; सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

बंड सुरू होऊन जवळपास वर्ष होत आले. बंडखोरांनी आपले बस्तान जवळपास पूर्ण संस्थानात पसरवले. स्थानिकांमध्येही ब्रिटिशांबद्दल असंतोष वाढू लागला. यामुळे बंडाची तीव्रता वाढली. ब्रिटिशांनी बंड मोडून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यातून बंडखोर आणि सत्ताधारी यांच्यात संघर्षाची धार वाढू लागली. या सगळ्यातून सावंतवाडी संस्थानमध्ये एक वेगळेच वातावरण तयार झाले. हे वातावरण ब्रिटिशांना असुरक्षित वाटू लागले. याला बांद्याजवळील डेगवे येथील घटना कारणीभूत ठरली. त्याकाळी ब्रिटिशांचे बेळगाव आणि वेंगुर्लेत ठाणे होते. बेळगावहून तिलारी रामघाटमार्गे वेंगुर्लेत ब्रिटिश सैनिकांचे जाणे-येणे असायचे. १३ डिसेंबर १८४४ ला लॉर्ड विल्यम कार्डवेल फावरे हा २१ वर्षांचा ब्रिटिश अधिकारी घोड्यावरून वेंगुर्लेकडे जात होता. सोबत इतर सैनिकही होते. तो डेगवे येथील स्थापेश्‍वर मंदिराजवळ आला असता तेथे दबा धरून बसलेल्या केशव गोंदे गवस-देसाई या तरुणाने त्याच्यावर गोळी झाडली. त्याकाळात या भागात गर्द राई होती. तेथूनच ही गोळी झाडण्यात आली. ती फावरे याला वर्मी लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला बांद्याकडे नेण्यात आले; मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या ब्रिटिश अधिकाऱ्याचे थडगे आजही बांदा कट्ट्याजवळ दोडामार्गकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आहे.

या घटनेनंतर ब्रिटिश हादरले. त्यांना हत्यारबंद सैनिकांशिवाय बाहेर जाणे धोकादायक वाटू लागले. फावरे याच्यावर गोळी झाडणाऱ्याला शोधण्यासाठी ब्रिटिशांनी डेगवे परिसरात बळाचा वापर सुरू केला; मात्र गोळी झाडणारे केशव गवस-देसाई इतर बंडवाल्यांमध्ये सक्रिय होते. खूप प्रयत्न करूनही त्यांचा पत्ता लागत नव्हता. इकडे ब्रिटिशांनी गावावर अत्याचार सुरू केले. शेवटी गावावरील हे संकट दूर व्हावे म्हणून डेगवेतीलच देवू नाईक-हळदणकर हा तरुण पुढे आला. त्यांनी आपणच केशव गवस-देसाई असल्याचा दावा केला. ब्रिटिशांनी त्यांना डेगवे येथेच आताच्या दोडामार्ग-बांदा मार्गालगतच्या एका काजऱ्याच्या झाडाला लटकवून फाशी दिली. ग्रामस्थांनी आता हे ठिकाण दाखवणारा फलकही तेथे लावला आहे.

या घटनेची दहशत ब्रिटिशांमध्ये बऱ्यापैकी बसली. त्यामुळे त्यांनी बंड मोडण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. पूर्ण संस्थानात जवळपास प्रत्येक गावात दाट जंगल होते. त्यामुळे बंडखोरांना वेचून पकडणे ब्रिटिशांना अवघड जात होते. अखेर स्थानिक यंत्रणेचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बंडाचा प्रसार आणखी वाढू नये म्हणून प्रयत्न सुरू केले. प्रत्येक गावातील गावकर, कुलकर्णी व फौजदारांनी एकत्र यावे. आपल्या गावातील कोण व्यक्ती बेपत्ता किंवा गैरहजर आहे, त्यांच्या नोंदी ठेवाव्यात. गावातील लोकांकडे असलेली हत्यारे जमा करून घ्यावीत. गावाच्या आजूबाजूचे जंगल तोडून टाकावे, असे हुकूम त्यांनी काढले.

हेही वाचा: राज्यातील एसटी जागेवरच थांबली! 24 जिल्ह्यांतील बससेवा बंद

बंडवाल्यांना पकडण्यासाठी खास पथके तयार करण्यात आली. याची जबाबदारी बांद्याचे सुभेदार आणि बाबूराव राणे या दोन सरदारांवर सोपवण्यात आली. प्रत्येकी ५० जणांचे पथक बनवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला. यातील प्रत्येक सैनिकाला दरमहा ४ रुपये इतका पगार ठरला. जानेवारी १८४५ मध्ये याबाबतचा हुकूम निघाला. त्यांनी बांदा आणि कुडाळ या भागात अशी पथके नेमावी आणि बंडवाल्यांना पकडावे, असे ठरवण्यात आले.

या हालचाली करत असतानाच बंडखोरांमध्ये फूट पाडण्यासाठीचे डावपेचही ब्रिटिशांनी आखले. ब्रिटिशांनी जाहीरनामा काढला. यात बंडाचे नेतृत्व करणारे प्रमुख याशिवाय फोंडसावंत तांबूळकर हे व त्यांच्या घराण्यातील इतर लोक आणि निर्दयी कृत्यामध्ये थेट सामील असलेले वगळता इतर सर्व बंडवाल्यांनी आपापल्या घरी परतावे. आपला व्यवसाय सुरू करावा. त्यांच्या पूर्वीच्या सर्व अपराधांना माफी द्यावी, असे यात म्हटले होते.

१५ जानेवारी १८४५ ला सावंतवाडी संस्थानात लष्करी कायदा लागू करण्यात आला. यानंतर जनरल डे ला मोटी व लेफ्टनंट कर्नल औट्स यांची बंड मोडून काढण्याच्या मोहिमेवर नियुक्ती करण्यात आली. जनरल मोटी हा मोठे सैन्य घेऊन हळदीचे नेरूरमध्ये हनुमंत घाटीच्या पायथ्यावर छावणी करून राहिला. आणखी एक लेफ्टनंट कर्नल कारुथर्स सी. बी. हाही याच घाटीच्या पायथ्याशी आपल्या तुकडीसह ठाण मांडून होता. कर्नल वॉलेस याची तुकडी मनोहरगड असलेल्या शिवापूरमध्ये एका टेकडीच्या शिखरावर ठेवण्यात आली. कर्नल औट्स हा आपले सैन्य घेऊन बंडवाले मोठ्या संख्येने असलेल्या कलंबिस्त गावावर १६ जानेवारी १८४५ ला चाल करून गेला. कर्नल वॉलेस हा टेकडीवरून शिवापूर परिसरात असलेल्या बंडवाल्यांवर गोळीबार करत होता.

ब्रिटिशांच्या हालचाली वाढल्या तरी बंडाची तीव्रताही आणखी वाढली. त्याचदरम्यान कोल्हापूर संस्थानातील सामानगडावर बंड करणारा सुभाना निकम हा बेळगाव येथील इंग्रजांच्या कैदेतून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तो थेट सावंतवाडी संस्थानातील बंडवाल्यांना येऊन मिळाला. त्याला येथील बंडवाल्यांनी मालवण परिसरात मोहिमेवर पाठवले. तेथे त्यांनी नियोजन करून अनेकांना आपल्याकडे वळवले. यामुळे बंडाची तीव्रता सावंतवाडी संस्थानच्या बाहेरपर्यंत पोहोचली.

बंडवाल्यांनी केली महसुलाची वसुली

युवराज आणासाहेब यांच्याकडे खासगी नोकर म्हणून असलेल्या दाजी लक्ष्मण काळे याने बंडवाल्यांच्या एका टोळीचे नेतृत्व केले. त्याने संस्थानच्या उत्तर भागात काही गावांमध्ये जाऊन सरकारला मिळणारा महसूल आपणच वसूल करायला सुरुवात केली. इंग्रजांच्या ताब्यात असलेल्या वराड तर्फ येथील खेड्यांमधील महसूलही त्याने आपले लोक पाठवून वसूल केली. इंग्रजांसाठी हे मोठे आव्हान होते.

Web Title: British Also Became Unsafe Travel Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top