मुंबई – गोवा महामार्गावरुन जाणारी बस संगमेश्वरात येताच जळून खाक : सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप

संदेश सप्रे
Friday, 10 July 2020

बस धामणी संगमेश्वर येथे येताच बसच्या मागील चाकाला आग लागली.अन्....

संगमेश्वर (रत्नागिरी) :  मुंबई – गोवा महामार्गावर संगमेश्वर पारेख पेट्रोलपंप येथे एक आराम बस पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने सर्व प्रवासी आराम बस मधून सुरक्षितपणे बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला. हा प्रकार आज सकाळी सात वाजून दहा मिनीटांनी घडला. यामध्ये आराम बस पूर्णत: जळून खाक झाली असून प्रवाशांचे सर्व सामानही जळून गेल्याने सुमारे तीस लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विरारहून देवगडला जाणारी साई श्रृती कंपनीची आराम बस क्रमांक एम एच 04 एच वाय 6010 घेऊन चालक धावू नानू बोडके ( 35 रा . विरार ) हा काल रात्री विरारहून 22 प्रवाशांना घेऊन देवगड येथे जाण्यासाठी निघाला . काल कशेडी घाटात दरड कोसळली असल्याने आराम बस दोन तासांपेक्षा अधिक काळ कशेडीतच रखडली होती .

हेही वाचा- काही सुखद -  कोरोनाचे संकट ओळखून यांनी मास्क विक्रीतून  मिळवले 3 लाखांहून अधिक रुपये...... -

साई श्रृती कंपनीची ही बस धामणी संगमेश्वर येथे येताच बसच्या मागील चाकाला आग लागली. अशा स्थितीतच बस पुढे धावत असल्याने आग अधिक भडकत गेली. मागून येणाऱ्या एका इनोव्हा चालकाने बसला आग लागल्याचे सांगताच आपण बस थांबवली अशी माहिती बस चालक धावू बोडके याने दिली. तातडीने बस मधील सर्व 22 प्रवाशांना बस मधून खाली उतरवून सुरक्षित ठिकाणी उभे करण्यात आले.

हेही वाचा- भारीच की ;  चक्क यांच्याकडे आहे 1851 पासून आतापर्यंतची 130 वर्षांची जुनी पंचांग.... -

दरम्यान बस वेगाने पेटू लागताच मापारी मोहल्ला, रामपेठ येथील तरुणांनी तातडीने पाण्याची व्यवस्था केली मात्र आग प्रचंड मोठी असल्याने बस प्रवाशांच्या सामानासह जळून खाक झाली . संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे, ए एस आय विभुते, हे. कॉ. कोष्टी, कॉ. कामेरकर आदि घटनास्थळी दाखल झाले. रत्नागिरी येथून फायर ब्रीगेडलाही पाचारण करण्यात आले. मात्र प्रवाशांच्या सर्व सामानासह बस जळून खाक झाली. यामध्ये 30 लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे पोलीसांनी सांगितले. दरम्यान यामध्ये प्रवाशांचे काही मौल्यवान सामान असल्याने नुकसानाचा आकडा वाढूही शकतो. प्रवाशांनी मात्र या आगीबाबत वेगळा सूर लावल्याचे घटानास्थळी ऐकायला मिळत होते.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Burn the comfort bus in Sangameshwar ratnagiri all passengers safe