बस चालक रस्ता चुकला अन्....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

रत्नागिरी जिह्यामधूनही ठाणे विभागात 23 कर्मचारी पाठविण्यात येणार होते. प्रत्यक्षात 15 कर्मचारीच ठाणे येथे गेले .रत्नागिरी व चिपळूण येथील एसटीचे चालक व वाहक घेऊन बस (एमएच-06-एस-9554) 5 एप्रिलला दापोली येथे आली.

दाभोळ ( रत्नागिरी ) - मुंबई व ठाणे परिसरात अत्यावश्‍यक सेवेसाठी एसटीचे कर्मचारी कमी पडत असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून 15 कर्मचारी एका बससह ठाणे येथे पाठविण्यात आली आहे. रत्नागिरी व चिपळूण येथील कर्मचारी घेऊन एसटी दापोली येथे आली. दापोलीतून 4 कर्मचाऱ्यांना घेऊन ही बस मंडणगड येथे कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी सरळ न जाता आंजर्ले, केळशी मार्गे गेली. चालक रस्ता चुकला असे कारण एसटीतर्फे देण्यात आले. मात्र वेगळेच कारण असल्याची चर्चा आंजर्ले येथे सुरू आहे. 

रत्नागिरी जिह्यामधूनही ठाणे विभागात 23 कर्मचारी पाठविण्यात येणार होते. प्रत्यक्षात 15 कर्मचारीच ठाणे येथे गेले .रत्नागिरी व चिपळूण येथील एसटीचे चालक व वाहक घेऊन बस (एमएच-06-एस-9554) 5 एप्रिलला दापोली येथे आली. दापोलीतून 4 कर्मचारी घेऊन रात्री दहाच्या सुमारास ही बस मंडणगड येथील कर्मचारी घेऊन ठाणे येथे जाणार होती. मात्र बस थेट मंडणगडकडे न जाता आंजर्लेत गेली.

आंजर्लेतील ग्रामस्थांना सर्व एसटी बसेस बंद असताना ही बस कोठून आली याचे आश्‍चर्य वाटले. गावकऱ्यांनी ही बस आंजर्ले येथे राम मंदिर थांब्यावर थांबवली. बसच्या चालकाकडे चौकशी केली .त्याने ठाणे येथे अत्यावश्‍यक सेवेसाठी जात असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. त्यांना थातुरमातूर कारणे सांगण्यात आली. गावकऱ्यांनी तहसीलदार समीर घारे यांना माहिती दिली.

त्यांनी दापोलीतील एसटीच्या एका कर्मचाऱ्याकडे याबाबत चौकशी केली असता ही बस ठाणे येथे अत्यावश्‍यक सेवेसाठी कर्मचारी घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले त्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेनुसार ही बस ग्रामस्थांनी सोडून दिली. 
ही बस आंजर्लेकडे गेलीच कशी याबाबत आता चर्चा रंगत आहे. या सगळ्यात किमान जेवणाचा डबा तरी चालक वाहकाला मिळाला, अशी चर्चा आंजर्लेत सुरू आहे. 

कर्मचाऱ्यांना घेउन जाणाऱ्या या बसवर रत्नागिरी आगाराचा चालक होता व तो रस्ता चुकल्याने ही बस आंजर्लेकडे गेली. 
- श्री. वणकुद्रे ,प्रभारी आगार व्यवस्थापक, दापोली आगार  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus Driver Miss Road And went To Anjerle Ratnagiri Marathi News