वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेला मंत्रिमंडळाची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

कणकवली - कोल्हापूर ते वैभववाडी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीच याबाबतची माहिती िट्‌वटरवर दिली. आता वर्षभरात या रेल्वे मार्गाचा आराखडा तयार होईल. त्याचबरोबर पर्यावरण आणि केंद्रीय वन्यजीव विभागाच्या आवश्‍यक त्या मंजुरी घेण्यात येतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

कणकवली - कोल्हापूर ते वैभववाडी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीच याबाबतची माहिती िट्‌वटरवर दिली. आता वर्षभरात या रेल्वे मार्गाचा आराखडा तयार होईल. त्याचबरोबर पर्यावरण आणि केंद्रीय वन्यजीव विभागाच्या आवश्‍यक त्या मंजुरी घेण्यात येतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर यांनी याबाबतची माहिती दिली.

श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच हिरवा कंदील दाखवला होता. आता केंद्राच्या कॅबिनेटमध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने निधी मिळण्यातील अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच कोल्हापूर ते वैभववाडी या नियोजित मार्गाचा डीपीआर तयार केला जाणार आहे. 

तो तयार करताना वनविभागाची कमीत कमी जागा घेण्याला प्राधान्य असणार आहे. या रेल्वे मार्गात दाजीपूर येथील अभयारण्याचा काही भाग येतो. त्यामुळे पर्यावरण विभागांसह केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी आवश्‍यक ठरणार आहे; मात्र रेल्वेसारख्या राष्ट्रीय प्रकल्पांना लवकरात लवकर या परवानगी देण्याचे धोरण केंद्र शासनाने असल्याने वनजमिनीचा फारसा अडसर होणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद झाल्याने आता डीपीआरसाठी एजन्सी नियुक्‍त करणे, प्रकल्पासाठी आवश्‍यक त्या परवानग्या मिळविणे ही कामे वेगाने मार्गी लागणार आहेत. हा प्रकल्प होण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पाठपुरावा केला होता. तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने चालना दिली होती. आता रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर कोकणातून पश्‍चिम महाराष्ट्रात होणारी धान्य व इतर मालाची वाहतूक रेल्वे मार्गे होणार आहे. यातून वाहतूक व्यवस्थेचा वेग आणि सुरक्षितता वाढणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरस्थितीमुळे सिंधुदुर्गात पेट्रोल, डिझेल, गॅस, भाजीपाला, धान्य आदींची टंचाई निर्माण झाली. भविष्यात अशा संकटाच्या वेळी पश्‍चिम महाराष्ट्राला एक वेगळी आणि महत्त्वाची संपर्क यंत्रणा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गामुळे मिळणार आहे.’’

कोकणच्या औद्योगिक क्षेत्रासाठी वरदान
वैभववाडी-कोल्हापूर ही नवी रेल्वेलाईन कोल्हापूरसह, रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या औद्योगिक क्षेत्रांसाठी वरदान सिद्ध होणार आहे. आर्थिक प्रगती, रोजगारनिर्मिती या सोबत सुलभ मालवाहतूक, विद्युतनिर्मिती, कोळसा वाहतूक इत्यादीसाठी हा मार्ग महत्त्वाची भूमिका पार पडेल असा विश्‍वास रेल्वेमंत्र्यांनी व्यक्‍त केला असल्याची माहिती श्री. काळसेकर यांनी दिली.

विजयदुर्ग बंदराचाही विकास
कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग पुढे विजयदुर्ग बंदराला जोडण्याचे प्रस्तावित आहे.  विजयदुर्ग बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाईल. या बंदरातून प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात-निर्यात होईल. त्यामुळे सिंधुदुर्गात नवीन उद्योगही उभे राहतील, असा विश्‍वास श्री. काळसेकर यांनी व्यक्‍त केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cabinet approves Vaibhavwadi-Kolhapur Railway