अतिक्रमण हटाओप्रश्नी सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा, म्हणाले...

case of removal of encroachment in sawantwadi mayor statement
case of removal of encroachment in sawantwadi mayor statement

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या पार्श्‍वभूमिवर मी कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे नगराध्यक्ष संजू परब यांनी विक्रेत्यांच्या बैठकीत सांगितले. येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईतील काही विक्रेत्यांनी पालिकेने केलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे यावेळी स्वागत केले. 

पालिका प्रशासनाकडुन बाजारपेठेत करण्यात आलेली अतिक्रमण हटाओची कारवाई योग्यच आहे. त्यात आता सातत्य ठेवले जावे, असे सांगुन बाजारपेठेतील भुसारी दुकानदार, फुल व भाजी विक्रेत्यांच्या एका गटाने नगराध्यक्ष परब यांची पाठराखण केली आहे. त्यांच्या या स्वागताच्या निर्णयानंतर आपण केलेली कारवाई योग्यच आहे, असा दावा नगराध्यक्षांनी केला आहे.

श्री. परब यांची आज येथील भाजी, फुले विक्रेते, व्यापाऱ्यांच्या एका गटाने भेट घेऊन समर्थनार्थ निवेदन दिले. यावेळी त्यांना श्री. परब यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ""आम्हाला पाठिंबा देणाऱ्या व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतो. काही झाले तरी आता त्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही. त्यांनी मी केलेल्या कारवाईचे समर्थन केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जे लोक विरोध करीत होते ते राजकीय अथवा बाहेरचे होते. त्यातील एकाचेही याठिकाणी दुकान नाही. असे असताना आज जे व्यापारी मला भेटले ते सर्वजण स्थानिक आहेत. त्यांनी माझ्या कारवाईचे स्वागत केले आहे.'' 

परजिल्ह्यातील व परराज्यातील भाजी विक्रेते, फुले विक्रेते गणेश चतुर्थीच्या तोंडावर येतील. त्यांना बसण्यासाठी जागा दिली जावू नये, अशी मागणी नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक नासिर शेख, आनंद नेवगी, अजय गोंधावले, बंटी पुरोहीत, अमित परब, केतन आजगावकर, संत गाडगेबाबा मंडईतील राकेश नेवगी, बाबा बांदेकर, बापू सुभेदार, विजय राणे, किशोर हरमलकर, सुधाकर राणे, चंद्रशेखर परब, अजित वारंग, विनायक केसरकर, मोहन पिळणकर, लवू तावडे आदी व्यापारी उपस्थित होते. 

भाजी विक्रेत्यांवर कारवाई होणार 
परब पुढे म्हणाले, ""आज तब्बल 87 लोकांनी अतिक्रमण निर्मूलन कारवाई योग्य असल्याचे पत्र दिले आहे. फक्त तिघांनी या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. त्याच बरोबर सायंकाळी पाचनंतर बाहेर बसणाऱ्या काही भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यानुसार आवश्‍यक ती नोटीस काढुन संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.'' 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com