बोगस खत पुरवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

एक नजर

  • मठ - टाकेवाडी येथील शेतकरी मंगेश महादेव नाबर यांना बेकायदेशीर व बोगस सेंद्रिय खत पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
  • कोल्हापूर येथील सेंद्रिय खत कंपनीचे निवृत्ती सोनवणे (रा.उस्मानाबाद) आणि राजू मकानदार (रा.कोल्हापूर) या वितरकावर गुन्हा दाखल

वेंगुर्ले -  मठ - टाकेवाडी येथील शेतकरी मंगेश महादेव नाबर यांना बेकायदेशीर व बोगस सेंद्रिय खत पुरवल्याप्रकरणी कोल्हापूर येथील सेंद्रिय खत कंपनीचे निवृत्ती सोनवणे (रा.उस्मानाबाद) आणि राजू मकानदार (रा.कोल्हापूर) या वितरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभाग व वेंगुर्ले तालुका कृषी विभागाला मिळलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून यात 1 लाख 92 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात तक्रात दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या पुढील आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

मठ येथील आंबा बागायतदार शेतकरी श्री नाबर याना कोल्हापूर येथील सेंद्रिय खत कंपनीतर्फे निवृत्ती सोनवणे (रा.उस्मानाबाद) आणि राजू मकानदार (रा.कोल्हापूर) या वितरकानी आपल्याकडे चांगले खत असल्याचे सांगून त्यांना सेंद्रिय खताच्या 40 किलोच्या 173 बॅग आणि हुमिक एसिड च्या 5 लिटरचे 20 कॅन व 1 लिटरच्या 35 बाटल्या विकत दिल्या होत्या. याची किंमत 1 लाख 92 हजार 84 रुपये आहे. कोल्हापूरची ही कंपनी कृषी आधार, कृषी वर्धन, जिवामृत या नावाने ही खते व कीटकनाशके विकतात; परंतु या खतांमध्ये पाहिजे त्या प्रमाणात शेतीला योग्य घटक नसल्याचे आढळून आले आहे.

याबाबत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाला माहिती मिळताच त्यांचे निरीक्षक पी. बी. ओहोळ, तालुका कृषी अधिकारी आर. डी. कांबळे, कृषी अधिकारी एस.एस.कुलकर्णी ,प्रभारी मंडळ कृषी अधिकारी एम. बी. मराठे यांच्या भरारी पथकाने मठ येथे धाड टाकून नाबर यांच्या शेत मंगरात ठेवलेल्या खताची पाहणी केली असता ते बोगस खत असल्याचे आढळून आले. यानुसार हा खत व औषधाचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चिकिचा माल उत्पादित करून विक्री केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the case of supply of bogus fertilizer, the accused filed for two