क्षणार्धात झाले होत्याचे नव्हते, काजुची मोठी हानी 

एकनाथ पवार
Saturday, 20 February 2021

हातातोंडाशी आलेले पीक अवकाळीने हिरावले आहे. या भागातील हजारो हेक्‍टरवरील काजु पिकांचे नुकसान झाले आहे. काजु बागायतदारांमध्ये निराशेचे वातावरण असून पूर्ण हंगामच वाया गेल्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - कुठे लाल, पिवळ्या रंगाचे लोंबणारे बोंडु तर कुठे हिरवे काजु तर काही ठिकाणी मोहोराने फुललेल्या काजु बागांचे काल (ता.18) वादळ आणि गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसाने क्षणात होत्याचे नव्हते केले. काही ठिकाणी काजुची झाडे उन्मळुन तर काही ठिकाणी मोडुन पडली. सह्याद्री पट्ट्याला तर वादळाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये बागायतदारांचे अक्षरक्षः कंबरडेच मोडले आहे.

हातातोंडाशी आलेले पीक अवकाळीने हिरावले आहे. या भागातील हजारो हेक्‍टरवरील काजु पिकांचे नुकसान झाले आहे. काजु बागायतदारांमध्ये निराशेचे वातावरण असून पूर्ण हंगामच वाया गेल्यामुळे आता करायचे काय? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. 
जिल्ह्यातील वैभववाडी आणि कणकवली तालुक्‍यातील सह्याद्री पट्टयात गेल्या काही वर्षांत काजुची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. हजारो हेक्‍टर क्षेत्र काजु लागवडीखाली आहे. गेल्या काही वर्षांत तर उत्पादनक्षम काजुचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

या भागातील काजु हेच मुख्यपीक आहे. यावर्षी काजुला चांगला मोहोर आला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या अवकाळीमुळे निर्माण झालेल्या संकटावर वेळोवळी कीटकनाशकांच्या फवारण्या करून मार्गक्रमण केले होते. वेंगुर्लेत चार काजुला सध्या चांगला बहर आला आहे तर वेंगुर्ले सातला बहर येण्याच्या स्थितीत होता. काही बागांमध्ये लाल, पिवळे बोंडु दिसत होते तर काही बागांमध्ये हिरवे काजु होते. याशिवाय काही ठिकाणी चांगला मोहोरही होता. त्यामुळे चांगल्या उत्पादनाची अपेक्षा बागायतदारांना होती; परंतु गुरूवारी सायकांळी सह्याद्री पट्टयात विजांचा लखलखाट आणि वादळीवाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.

एवढेच नव्हे तर गारांचा अक्षरक्षः वर्षाव झाला. सह्याद्री पट्ट्याला तर वादळाने झोडपुन काढले. याचा सर्वाधिक फटका काजु बागायतदारांना बसला. हातातोंडाशी आलेला घास क्षणात वादळाने हिरावला. काजुच्या झाडाखाली अपरिपक्व काजु बी चा खच पडला. झाडावरील मोहोर देखील गळुन पडला. एवढेच नव्हे तर काजुची हिरवीगार पाने गारांनी फाटली असुन ती सफेद रंगाची झाली आहेत. गारांमुळे हिरव्या काजुवर डाग पडले आहेत. काही गावातील काजुची झाडेच उन्मळुन पडली आहेत. 

वैभववाडी तालुक्‍यातील कुर्ली, आर्चिणे, लोरे, खांबाळे, सडुरे, अरूळे, करूळ, सांगुळवाडी, नावळे, कुंभवडे, भुईबावडा, ऐनारी या गावांत हजारो एकर काजुचे उत्पादनक्षम क्षेत्र आहे. कणकवली तालुक्‍यातील घोणसरी, फोंडा, हरकुळ या गावांनाही वादळाचा फटका बसला आहे. हजारो शेतकऱ्यांचे काजु हेच मुख्यपीक आहे. तालुक्‍याच्या अर्थकारणात काजुपीक महत्वाचे मानले जाते. गेल्यवर्षीचा हंगाम कोरोनामुळे वाया गेला. त्यामुळे यावर्षीच्या हंगामावर अनेक शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबुन होती; परंतु वादळ आणि गारांनी ही स्वप्ने धुळीस मिळविली. सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण आहे. 

पाचशे हेक्‍टरला फटका 
सांगुळवाडी, खांबाळे, नावळे, अरूळे, करूळ, भुईबावडा आणि ऐनारी या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांमधील वातावरण काजुसाठी पोषक आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात या गावांमध्ये काजु लागवडीत मोठी वाढ झाली. पाचशेहुन अधिक हेक्‍टर क्षेत्र या गावांमध्ये आहे. त्या सर्व क्षेत्रावरील बागांचे नुकसान झाले आहे. 

पंचनामे करण्याची मागणी 
तालुक्‍यात काजु पिकांचे मोठे नुकसान वादळ आणि गारपीटमुळे झाले आहे. काजुचा हंगामच वाया गेल्याचे चित्र आहे. या नुकसानीचा पंचनामे तत्काळ कृषी विभागाने करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात आहे. 

हातातोडांशी आलेला घास गेला 
- सह्याद्री पायथ्याच्या गावांना तडाखा 
- तीनशेहुन अधिक शेतकऱ्यांचे नुकसान 
- मोहोरच गळुन पडल्यामुळे हंगाम वाया 
- अनेक बागांमधील झाडे उन्मळुन पडली 
- काजुला बहर येत असतानाचा तडाखा 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cashew damage due rain vaibhavwadi konkan sindhudurg