संकटांची श्रृखंला संपेना, काजू बागायतदार चिंतेत

एकनाथ पवार
Monday, 21 September 2020

अगोदरच काजूच्या दर घसरणीने वैतागलेल्या शेतकऱ्यांचा काजू पिकांकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलत आहे. आतापर्यंत हमखास पीक म्हणुन गणला गेलेला काजू आता शेतकऱ्यांना बेभरवशाचा वाटु लागला आहे.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - काजू बागांवर टी मॉस्कीटोसह विविध कीड रोंगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यामुळे काजू बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. सलग दुसऱ्यावर्षी या रोगाचे प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काजू पिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे. 

जिल्ह्यात हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणुन काजूकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना काजुने आर्थिक स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. जिल्ह्यातील काजू लागवडीचे क्षेत्र वर्षागणिक 5 हजार हेक्‍टरने वाढत आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाचे मानले गेलेले काजू पीक सध्या विविध मार्गांनी संकटात सापडत आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक बागायतदारांच्या बागा उद्‌ध्वस्त झाल्या. त्यातही काही बागायतदारांनी प्रयत्नाची शिकस्त करीत काजुचे उत्पादन घेतले; परंतु त्यानंतर काजूच्या दरात विक्रमी घसरण झाली.

काजू बागायतदारांचे कंबरडेच मोडुन गेले; मात्र अजुनही बागायतदारांच्या संकटांची श्रृखंला संपलेली नाही. यंदाही अनेक काजू बागांमध्ये विविध कीड रोंगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. टी मॉस्कीटो, शेंडेमर, फांदीमर, पानगळ अशा विविध कीडरोंगामध्ये बागायतदारांमध्ये चिंता आहे. त्यातच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या फवारण्याही करता येत नाही. अगोदरच काजूच्या दर घसरणीने वैतागलेल्या शेतकऱ्यांचा काजू पिकांकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलत आहे. आतापर्यंत हमखास पीक म्हणुन गणला गेलेला काजू आता शेतकऱ्यांना बेभरवशाचा वाटु लागला आहे. 

विमा संरक्षण नावापुरतेच 
हवामानावर आधारीत फळपीक योजनेत काजुचा समावेश आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेकडो काजू बागायतदार दरवर्षी काजुचा विमा उतरवितात; परंतु हे विमा संरक्षण नावापुरतेच असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. यंदा आंबोली आणि मसुरे महसूल मंडळातील दोन शेतकऱ्यांनाच काजू विमा परतावा मिळाला. उर्वरित जिल्ह्यात वादळ, वारा आणि ढगाळ वातावरणाने काजूचे नुकसान झाले; मात्र त्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे काजू विमा संरक्षण नावापुरतेच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cashew growers in Sindhudurg are worried