प्रक्रिया उद्योगाअभावी काजू बोंडू फेकून देण्याची वेळ 

cashu issue konkan sindhudurg
cashu issue konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडे प्रक्रिया उद्योग रखडले असून काजू बोंडे गोवा राज्यात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाते. जिल्ह्यात बोंडूवर प्रक्रिया उद्योग सुरू नसल्याने काजू बागायतदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. गोवा सीमेवर नसलेल्या भागातील बराचसा बोंडू फेकून देण्याची वेळ बागायतदारांवर येते. 

काजू बागायतदार वर्षभर काजू शेतीची मशागत करतात. दोन-तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ते काजू पीक घेतात. काजू बीपासून काजूगर, टरफलापासून ऑईल करण्यात येते. याला स्थानिक बाजारपेठेसह इतर राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. काजू बोंडूपासून मद्य निर्मिती करण्यात येते.बोंडू वाया जाऊ नये म्हणून प्रकल्प निर्माण करण्यासाठी तालुक्‍यात दोन सहकारी तत्त्वावर प्रकल्प नोंदणी केली होती; मात्र या प्रकल्प संस्थाना शासन दरबारी योग्य ती सहकार्याची भूमिका मिळाली नाही. 

दरवर्षी प्रमाणे या हंगामात काजू बागायतदार काजू बी आणि बोंडे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात असूनही या दोन्हीवर अपेक्षित प्रक्रिया उद्योग नाहीत. काजू बीवर छोटे-छोटे प्रक्रिया उद्योग असले तरी मोठ्या प्रमाणात काजू बी ही दलालांच्या घशात घातली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना नाममात्र दर मिळतो. काजू बी आणि बोंडू यावर प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातच निर्माण झाले तर काजू बागायतदार आर्थिक अडचणीत सापडणार नाहीत. असे असतानाही राजकीय अनास्थेमुळे शासन दरबारी शेतकऱ्यांचे काही चालेनासे झाले आहे.

आपल्या जवळील गोवा आणि केरळ राज्याने काजू बागायतदार शेतकऱ्यांना काजू बीला हमीभाव दिला आहे. केरळ राज्याचे काजू बोर्डाची कार्यालय जिल्ह्यात निर्माण झाली आहेत; मात्र राज्यात काजूला हमीभाव नाही आणि मागणी असूनही काजू बोर्ड निर्माण झालेले नाही. 

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्‍यात काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग नसल्याने ही बोंडे गोवा राज्यात निर्यात केली जातात. या बोंडाना एक डबा मागे 13 ते 15 रुपये तर दोडामार्ग भागांमध्ये किलोमागे 20 किंवा 25 पैसे दर मिळतो. गोवा राज्यातील काजू फेणी किंवा काजू मद्य निर्मिती प्रकल्पधारक कारखानदार दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्‍यातील काजू बागायतीमधून ही बोंडे प्रक्रियेसाठी घेऊन जातात. या काजू बोंडापासून मोठ्या प्रमाणात मद्यार्क निर्माण करतात. 

गोवा राज्यात महागड्या मद्यार्क निर्मितीसाठी जिल्ह्यातील काजू बोंडे फायदेशीर ठरत असताना जिल्ह्यातील राजकीय अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर येत आहे. फक्त श्रेयासाठी राजकारण केले जाते; पण शेतकरी बागायतदार मात्र चिंताग्रस्त बनले आहेत. याकडे कोणाचे लक्ष नाही. या हंगामात गोवा राज्यात काजू बोंडाना मोठ्या प्रमाणात मागणी आहे; मात्र राज्यातील काजू बी आणि बोंडू यावर हमीभाव नाही किंवा उत्पादन खर्चापेक्षा जास्त पैसे मिळविण्याचे साधन नसल्याने काजू शेती किफायतशीर असूनही ती शेतकऱ्यांना आर्थिक चणचण भासवणारी ठरत आहे. या हंगामात पर्यावरणातील बदल व अवकाळी पावसाने काजू बागायतदारांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.

काजू प्रक्रिया उद्योग जिल्ह्यात निर्माण करण्यासाठी राजकीय आशीर्वादाची गरज आहे; मात्र राजकीय अनास्थेमुळे काजू बोंडावर प्रक्रिया होत नाहीत. कोकण कृषी विद्यापीठाने काजू बोंडावर प्रक्रिया करणारी छोटी छोटी यंत्रे तयार केली आहेत; मात्र त्यावर आधारित शासनाच्या सबसिडीसह उत्पादन आणि मार्केटिंगबाबत योजना नसल्यामुळे काजू बोंडे गोव्यातील कारखानदारांच्या दरानुसार विकावी लागत आहेत, असे काजू बागायतदार शेतकरी सांगतात. 

राजकीय अनास्थेच्या पोटी शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत; मात्र शासन आणि राज्यकर्त्यांनी काजू बागायतदारांसाठी योग्य निर्णय घेण्याबाबत मागणी होत आहे. राजकिय पुढाऱ्यांनी व लोकप्रतिनीधींनी काजू बी आणि बोंडू यावर योग्य दराचा उपाय शोधण्यासाठी तसेच प्रक्रिया उद्योगाबाबत बागायतदार शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी मागणी होत आहे. 

जिल्ह्यातील काजूसह बोंडूलाही गोव्यात मागणी आहे. जिल्ह्यातील बोंडू गोव्यात जातो; मात्र गोवा सीमेपासून दूर असलेल्या गावातील सर्वच बोंडू गोव्यात नेणे कठिण आहे. जिल्ह्यात एखादा तरी मद्यनिर्मिती किंवा प्रक्रिया उद्योग असता तर बागायतदारांना आर्थिक फायदा झाला असता आणि बोंडूही फेकून देण्याची किंवा खराब होण्याची वेळ आली नसती. 
- गुरूदास गवंडे, उपसरपंच, ग्रामपंचायत निगुडे 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com