नागदेवतेचा तीन दिवस बाप्पासोबत मुक्काम, कुटुंबाची पाचावर धारण

अजय सावंत
Tuesday, 1 September 2020

सुदैवाने ही बाब संबंधित कुटुंबाच्या ध्यानात आली शिवाय विपरीत काही घडले नाही. देखावा आणि इतर साहित्य बाजूला काढून सापाला सुखरुप बाहेर कसे काढावे, असा प्रश्‍न कुटुंबासमोर उभा राहिला.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आपली भारतीय संस्कृती जगात वंदनीय आहे. निसर्गातील प्रत्येक घटकाला येथे स्थान आहे. सध्या कोरोनाच्या साथीतही घरोघरी बाप्पाचे आगमन झाले असून सगळीकडे आनंदी वातावरण आहे. यातच मातोंडमार्गे गोव्याला जाताना लागणाऱ्या एका गावात नागदेवता चक्क तीन दिवस बाप्पासोबत वास्तव्यास आल्याचे समोर आले. 

संबंधित घरात प्रतिवर्षाप्रमाणे बाप्पाचे यथाविधी पूजन करण्यात आले आणि आकर्षक देखावा साकारला गेला. घरात चैतन्यमय वातावरण होते. आणि त्या दरम्यान एक नाग घराच्या छपरावरून खाली कोसळला आणि थेट बाप्पाच्या देखाव्यात शिरला आणि तब्बल तीन दिवस वास्तव्यास राहिला.

सुदैवाने ही बाब संबंधित कुटुंबाच्या ध्यानात आली शिवाय विपरीत काही घडले नाही. देखावा आणि इतर साहित्य बाजूला काढून सापाला सुखरुप बाहेर कसे काढावे, असा प्रश्‍न कुटुंबासमोर उभा राहिला. शेवटी वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेस सिंधुदुर्ग या टीमला पाचारण करण्यात आले. टीमचे अध्यक्ष अनिल गावडे, महेश राऊळ, वैभव अमृस्कर, नाथा वेंगुर्लेकर, दीपक दुतोंडकर घटनास्थळी तत्काळ दाखल झाले.

देखाव्याला तसेच कोणत्याही साहित्याला न हलवता त्या सापाला बाहेर काढणे या टीमसमोर आव्हान होते. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नागाला चक्क बाप्पाच्या बैठकीच्या पाटाखालून सुखरूप बाहेर काढले आणि सर्वांनी निःश्‍वास सोडत गणरायाला वंदन केले. त्यानंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले. 

पावसामुळे बिळात पाणी गेल्यामुळे सर्प बाहेर पडतात. भक्षाच्या शोधात ते भटकतात व मानवी वस्तीत येतात. दक्षता हाच त्याला जालीम उपाय आहे. शिवाय सर्पांना पकडण्यासाठी वाईल्ड लाईफची टीम कटिबद्ध आहे. 
- अनिल गावडे, अध्यक्ष, वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्‍यू सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग 
 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: caught a snake from a house kudal sindhudurg