esakal | लोकमान्यांची स्मृती शताब्दी : जन्मभूमीत आल्याची नाही नोंद ,मुंजही रत्नागिरीत, चिखलगावात विवाह..
sakal

बोलून बातमी शोधा

Century of Lokmanya tilak memory  Marriage at Ratnagiri  Chikhalgaon

लोकमान्य टिळकांचे बालपणी १० वर्षे वास्तव्य ;

लोकमान्यांची स्मृती शताब्दी : जन्मभूमीत आल्याची नाही नोंद ,मुंजही रत्नागिरीत, चिखलगावात विवाह..

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : दापोलीजवळचे चिखलगाव हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे मूळ गाव. पण लोकमान्यांचा जन्म रत्नागिरीच्या मधल्या आळीतील सदोबा गोरे यांच्या घरात झाला. टिळक येथे दहा वर्षे वास्तव्यास होते. टिळकांची मुंजही येथेच झाली. जन्मभूमी रत्नागिरी असलेल्या टिळकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी पाया रचला. टिळक नंतर पुन्हा रत्नागिरीत आल्याचा संदर्भ सापडत नाही, अशी माहिती अभ्यासक ॲड. विलास पाटणे यांनी दिली.


हेही वाचा- सिंधुदुर्गात निर्बंध शिथिल; पण... -

लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी सांगितले, टिळकांच्या बऱ्याच पिढ्या चिखलगावात खोती सांभाळत. वडिलांनी कौटुंबिक आपत्तीमुळे शिक्षण अर्धवट सोडून शाळा खात्यात नोकरी धरली. रत्नागिरीत बदलीवर आल्यानंतर त्यांचा डॉ. रामकृष्ण भांडारकर यांच्याशी संस्कृत भाषेच्या आवडीमुळे स्नेह जुळून आला. 


टिळक आळीत लोकमान्यांचा २३ जुलै १८५६ रोजी जन्म झाला. १८६६ सालात पुण्यास जाईपर्यंत टिळक या घरात राहिले. १८६१ मध्ये टिळक दसऱ्याच्या मुहूर्तावर शाळेत जाऊ लागले. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले टाकणार नाही’ ही प्रसिद्ध घटना येथे घडली असावी. टिळकांचे पहिले शिक्षक भिकाजी कृष्ण पटवर्धन. वडिलांची बदली असिस्टंट एज्युकेशन ऑफिसर म्हणून पुण्याला झाल्यावर टिळकही पुण्यास रवाना झाले.

गंगाधरपंतांनी सुतारकामाच्या कारखान्यात गुंतविलेल्या हजार रुपयांच्या चार वर्षांच्या व्याजाच्या रकमेची मागणी लोकमान्यांच्या लग्नाच्या खर्चाकरिता पत्राद्वारे केली होती. पैसा हाती आल्याशिवाय लग्नाची तयारी व ठराव करता येत नाही, असा पत्रात उल्लेख सापडतो. टिळक इंग्रजी शाळेत पुण्यास शिकत असता १८७१ च्या वैशाखात त्यांचे लग्न चिखलगावात झाले.

हेही वाचा- गणेशोत्सवाच्या पार्शभूमीवर मालवण पंचायत समितीचे कठोर निर्णय -


जमीन कुलदैवतास अर्पण
१८८९ मध्ये टिळक चिखलगावाला गेले होते. १८९४ मध्ये दापोली कोर्टात झालेल्या वाटपाच्या एका दाव्यात टिळकांना सामील प्रतिवादी व्हावे लागले. अखेर वाटपाचा निवाडा होऊन खुद्द टिळकांच्या वाट्याला आलेली जमीन त्यांनी कुलदैवत लक्ष्मीकेशव याला अर्पण केली. देशाला स्वराज्याचा मूलमंत्र देणारे, असंतोषाचे जनक, राष्ट्रीय अस्मितेचा तेजःपुंज आविष्कार असलेले लोकमान्य इंग्रजांच्या शत्रूंच्या यादीत नंबर १ वर होते. त्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या गुप्तचर खात्याने इंग्लंडला सांकेतिक भाषेत ‘नंबर वन, नो मोअर’ असा संदेश धाडला होता, असे ॲड. पाटणे यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे