गणेशोत्सवासाठी रेल्वेचे स्वप्न धूसर, खासगी बसेसवरच भिस्त

तुषार सावंत
Saturday, 8 August 2020

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जातील, हे स्वप्न मात्र आता अधुरेच राहण्याची शक्‍यता आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवासाठी आता अठरा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. गावात येऊन क्‍वारंटाईन होण्यासाठी 7 ऑगस्ट ही डेडलाईन होती. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना गावाकडे येण्यासाठी खासगी गाड्यांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जातील, हे स्वप्न मात्र आता अधुरेच राहण्याची शक्‍यता आहे. 

गणेशोत्सव साजरा करण्याचा कालावधी जसजसा जवळ येत आहे, तसे मुंबई आणि परराज्यातील चाकरमानी कोकणातील आपल्या गावाकडे दाखल होऊ लागले आहेत. मुंबईहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या आता कित्येक पटीने वाढू लागली आहे. खासगी गाड्या किंवा स्वमालकीच्या गाड्या, खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस अशा विविध वाहनांचा आसरा घेत मुंबईचा चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावाकडे येऊ लागले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने येणाऱ्या चाकरमान्यांच्या कोरोना चाचणीच्या उपाययोजना सुरू केली आहे. खारेपाटण सीमेवरच ही तपासणी करून चाकरमान्यांना त्यांच्या होम क्‍वारंटाईन व्यवस्थेची पाहणी केली जात आहे. काही गावांमध्ये संस्थात्मक क्‍वारंटाईनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे; परंतु शासनाकडून केवळ क्‍वारंटाईन करण्यापुरती सुविधा आहे.

येणाऱ्या चाकरमान्यांना स्वतःचा सगळा खर्च करावा लागत आहे. तरीही चाकरमानी मोठ्या संख्येने गावाकडे येऊ लागले आहेत. गावाकडे येऊन क्‍वारंटाईन होण्यासाठी 7 ऑगस्ट डेडलाईन मानली जात होती. अनेक ग्रामपंचायतींनी तसा लिखित नियमच करून तसे संदेश मुंबईच्या चाकरमान्यांना दिल्याने, चाकरमानी मिळेल त्या वाहनाने गणेशोत्सवासाठी अगदी 14 दिवसांपूर्वी गावात पोहचू लागले आहेत.

आता शासनाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात क्वारंटाईन कालावधी 10 दिवसांवर आणला आहे. त्यामुळे डेडलाईन 12 तारखेपर्यंत आणली आहे. तरीही अनेक गावांत 14 दिवसांचा आग्रह धरला जाण्याची शक्‍यता आहे. विशेष म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी मुंबईतील रेल्वे संघर्ष समिती आणि प्रवासी संघटनांनी केली आहे.

याबाबत जवळपास 70 पेक्षा अधिक विविध संघटनांनी निवेदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल व अन्य नेते मंडळींना दिली आहेत; मात्र या सगळ्या निवेदनांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. देशभरातील रेल्वेची सार्वजनिक सुविधा 31 मार्चपासून बंद आहे. त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात अडकलेल्या उत्तर भारतीय मजुरांसाठी मात्र श्रमिक रेल्वे एप्रिल मे आणि जूनपर्यंत सोडण्यात आल्या. या धर्तीवर कोकणातील चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव विशेष गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होती; परंतु आता या मागणीलाही फारसा अर्थ राहिलेला दिसत नाही. 

यंत्रणेवर ताण शक्‍य 
चाकरमान्यांसाठी रेल्वे सोडावी, असा एक मतप्रवाह शासनस्तरावर होता; मात्र असे झाल्यास कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या क्वारंटाईन, वैद्यकीय तपासणी व इतर व्यवस्थांवर नियंत्रण ठेवणे कठीण बनेल, अशी चर्चा झाली. यामुळे तूर्तास रेल्वे फेरी सोडण्याचा प्रस्ताव मागे पडल्याचे समजते. 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे सोडावी, अशी मागणी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे; मात्र केंद्राकडून निर्णय झालेला नाही. रेल्वे सुरू करण्याचा निर्णय हा केंद्राचा आहे; मात्र जे चाकरमानी येणार आहेत त्यांना त्रास होऊ नये, त्यांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घेण्याची जबाबदारीही आमची आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री 

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांचा कोणताही निर्णय राज्य सरकारने न घेतल्याने त्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. क्वारंटाईन व्हायचे असल्याने अवघे दोन दिवसच प्रवास करता येणार आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस ठाण्यात पास द्या किंवा अन्य व्यवस्था करा, यासाठी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. 
- ऍड आशिष शेलार, आमदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakarmani issue in konkan Sindhudurg