esakal | शिवसेनेला कोकण राखण्याचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Challenge Before Shiv Sena To Maintain Domination In Konkan

नुकत्याच झालेल्या विधानसभेत युती असली तरी कोकणात बऱ्याच ठिकाणी शिवसेना-भाजपातच सत्तासंघर्ष पहायला मिळाला. आता या बदललेल्या समीकरणात मुसंडी मारायचा प्रयत्न करणार आहे; पण विरोधी बाकावर बसून वर्चस्व राखणे शिवसेनेसाठी पुढच्या काळात सोपे असणार नाही.

शिवसेनेला कोकण राखण्याचे आव्हान

sakal_logo
By
शिवप्रसाद देसाई

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) -  महाराष्ट्रात अचानक बदललेली सत्ता समीकरणे केवळ सिंधुदुर्गच नाही, तर कोकणात शिवसेनेच्या वर्चस्वाला पुढच्या काळात आव्हान देणारी ठरणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राजकीय साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची संधी यातून मिळण्याची चिन्हे आहेत. सिंधुदुर्गात भाजपला अच्छे दिन येण्याचा मार्ग यातून खुला होऊ शकतो. कोकण म्हणजे शिवसेना, असे समीकरण गेली अनेक वर्षे रूढ झाले होते. युतीच्या गेल्या काही वर्षांतील जागा वाटपात कोकणात शिवसेनेलाच झुकते माप मिळाले. यामुळे भाजपला विधानसभेत ताकद आजमावयाची फारशी संधी मिळाली नव्हती. २०१४ च्या निवडणुकीपासून मात्र भाजपने कोकणातही स्वतंत्र तयारी सुरू केली. 

नुकत्याच झालेल्या विधानसभेत युती असली तरी कोकणात बऱ्याच ठिकाणी शिवसेना-भाजपातच सत्तासंघर्ष पहायला मिळाला. आता या बदललेल्या समीकरणात मुसंडी मारायचा प्रयत्न करणार आहे; पण विरोधी बाकावर बसून वर्चस्व राखणे शिवसेनेसाठी पुढच्या काळात सोपे असणार नाही.

शिवसेनेसाठी लढाई अवघडच

सिंधुदुर्गाचा विचार करता तीनपैकी कणकवलीची एकच जागा भाजपने कमळ चिन्हावर लढविली. निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची साथ मिळाल्याने भाजपला गावोगाव रेडीमेड संघटनात्मक बळ मिळाले. या जोरावर उर्वरित दोन ठिकाणी बंडखोर उमेदवारांना भाजपने उघड पाठिंबा दिला. अपक्षांसह भाजपला जिल्ह्यात मिळालेली एकूण मते शिवसेनेच्या तुल्यबळ आहेत. अशा स्थितीत भाजप सत्तेत, त्यांना राणेंमुळे मिळालेली ताकद आणि तुलनेत शिवसेना विरोधात, असे समीकरण बसल्याने ही लढाई शिवसेनेसाठी सोपी राहणार नाही.

शिवसेनेची कमजोरी हेरून शह देण्याचा प्रयत्न

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा विचार करता येथे शिवसेनेच्या दीपक केसरकर यांना भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी जोरदार झुंज दिली. तेली कमळ या अधिकृत चिन्हावर लढले असते, तर ही लढत आणखी चुरशीची होणार होती. सत्तेत आल्याने आता तेली आणखी सक्रिय होऊ शकतात. यातच केसरकर यांचे थेट नारायण राणेंशी शत्रुत्व आहे. यामुळे राणेंची संघटनात्मक ताकद आणि भाजपचे केडर केसरकरांना शह देण्याचा पुढच्या पाच वर्षांत प्रयत्न करणार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेला मानणारी व्होट बॅंक आहे. मात्र, संघटना फारशी मजबूत नाही. भाजप हीच कमजोरी हेरून येथून शिवसेनेला शह देऊ शकते. 

माजी खासदार नीलेश राणे सक्रिय

कुडाळमध्ये भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई नवखे असूनही त्यांनी चांगली मते मिळवली. इथे वैभव नाईक यांच्याकडे संघटनात्मक बांधणी चांगली असली, तर ती बरीचशी व्यक्तिकेंद्रित आहे. गेल्या पाच वर्षांत सत्तेमुळे झालेली विकासकामे नाईक यांच्यासाठी जमेची बाजू होती. सत्तेत नसणे त्यांच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. येथे भाजपची संघटनात्मक ताकद कमी असली तरी राणेंचे बळ मोठे आहे. गेल्या काही दिवसांतील राजकीय हालचाली पाहता येथे माजी खासदार नीलेश राणे सक्रिय झाल्याचे दिसतात. त्यामुळे पुढच्या विधानसभेच्या दृष्टीनेही ते येथे तयारी करू शकतात. तसे झाल्यास नाईक यांच्यासमोर वर्चस्व टिकविण्याचे आव्हान असणार आहे.

शिवसेनेसमोर भाजपचे कडवे आव्हान

कणकवली आधीच भाजपच्या ताब्यात आली आहे. सतीश सावंत यांच्या रूपाने येथे शिवसेनेला नेतृत्व मिळाले आहे. त्यांनी येथे भगवा फडकवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, राज्यातील बदललेली सत्ता समीकरणे यात अडथळे आणण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या बदलाच्या पुढच्या लोकसभेच्या लढतीवरही प्रभाव पडू शकतो. चिपळूणपर्यंत पसरलेल्या मतदारसंघात सिंधुदुर्गासह रत्नागिरीत शिवसेनेतील मोहरे आपल्याकडे खेचण्याचा भाजपकडून प्रयत्न होऊ शकतो. अशा वेळी शिवसेनेसमोर भाजपचे कडवे आव्हान उभे करणार आहे.

राणेंना बळ 

सत्तेच्या नव्या समीकरणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राजकीय साम्राज्य पुन्हा उभे करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेनेचे कडवे विरोधक असल्याने भाजप त्यांना बळ देण्याची शक्‍यता आहे. सिंधुदुर्गात त्यांना माणणाऱ्या मतदारांचे बळ अजूनही टिकून आहे. भाजपची शिस्तबद्ध संघटना, संघाचे पडद्यामागून मिळणारे बळ आणि राणेंची संघटनात्मक फळी ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू ठरू शकते. 

मोजकेच आमदार

कोकणात भाजपमधून मोजकेच आमदार निवडून आले आहेत. रत्नागिरी -सिंधुदुर्गात तर नीतेश राणे हे एकमेव आमदार आहेत. शिवाय त्यांची दुसरी टर्म आहे. यामुळे त्यांना मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे.

loading image