बदलत्या वातावरणामुळे 1984 नंतर यंदा प्रथमच हापूसवर संक्रांत

राजेश कळंबटे
रविवार, 7 एप्रिल 2019

आतापर्यंतच्या हंगामात ही सर्वांत अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. थ्रिप्समुळे मोहोरच गळून गेला असून वातावरणही पोषक नाही. फवारणीसाठी झालेला खर्च पेटीला 250 रुपयांवर पोचला आहे. त्यामुळे आर्थिक गणित बिघडणार आहे.

- डॉ. विवेक भिडे, बागायतदार

रत्नागिरी - बदलत्या वातावरणाचे चटके यंदा संवेदनशील हापूसला बसले आहेत. नोव्हेंबरमध्ये समाधानकारक पिकाची आशा निर्माण झाली असतानाच मोहोर वेळेत परिपक्व न झाल्याने तो थंडीच्या कडाक्यात सापडला. याच कालावधीत थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. ही परिस्थिती 1984 नंतर यावर्षी प्रथमच निर्माण झाली आहे. 10 एप्रिल ते 10 मेपर्यंत मुबलक उत्पादन मिळाल्याने मार्केटमध्ये फिलगुड येईल. पण हंगामातील सरासरी गणित बिघडल्याने बागायतदारांना पुन्हा सरकार दरबारी मदतीसाठी झोळी पसरावी लागणार आहे.

पर्यावरणातील बदलांचा परिणाम वातावरणावर होत आहे. तापमानातील असमतोल पिकांसाठी घातक ठरत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. तीच परिस्थिती कोट्यवधीची उलाढाल करणार्‍या कोकणच्या हापूसवर ओढवली आहे. मार्चअखेरपर्यंत किमान तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमाने 36 अंशापर्यंत वर चढत आहे. तापमानातील या फरकाचा परिणाम हापूसवर होतो. नोव्हेंबरनंतर थंडी पडायला सुरवात झाली आणि मोहोरही चांगला आला.

अवकाळीचाही फटका यावर्षी बसलेला नाही. डिसेंबरमध्ये झालेल्या फयान वादळानंतरची स्थिती पुन्हा उद्भवलेली नाही; परंतु सलग तीन महिने थंडीचा कडाका राहिला. कलमांना आलेला मोहोर परिपक्व बनण्यासाठी पूरक वातावरण नव्हते. सलग थंडीने पुन्हा मोहोर आला आणि हापूसचे आर्थिक अंदाज फोल ठरण्यास सुरवात झाली. मध्येच ढगाळ वातावरणामुळे निर्माण झालेल्या थ्रिप्सने (फुलकिडी) आलेला मोहोर गळून गेला. झाडावर मोहोराच्या जागी काड्या दिसू लागल्या.

1 मार्चनंतर कोकणातून वाशी बाजारात सुमारे 50 ते 55 हजार पेट्या जातात. त्या जागी सरासरी पेट्या 25 ते 30 हजारच जात आहेत. झाडावर आंबाच कमी असल्याने बागायतदार पेट्या भरणार कुठून असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हंगामातील नफा हा 1 मार्च ते 15 एप्रिलमध्ये मिळणार्‍या दरावर अवलंबून असतो. यंदा आवक कमी असल्याने दर चांगला आहे; परंतु मालच नसल्याने बागायतदार अडचणीत आला आहे. फेब्रुवारीत पाठविलेल्या फळाचा दर्जा घसरलेला होता. उष्मा वाढल्यामुळे राहिलेला आंबा मार्केटमध्ये वेगाने जाण्यास सुरवात झाली आहे. हा माल 10 एप्रिल ते 10 मे या कालावधीत जात राहील. या काळात आवक वाढल्याने दर खाली येतील. तेवढ्याच कालावधीकरिता बागायतदारांमध्ये फिलगुड राहील; मात्र हंगामाच्या शेवटची नफा-तोट्याची आकडेवारी धक्का देणारी ठरणार आहे.

आतापर्यंतच्या हंगामात ही सर्वांत अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. थ्रिप्समुळे मोहोरच गळून गेला असून वातावरणही पोषक नाही. फवारणीसाठी झालेला खर्च पेटीला 250 रुपयांवर पोचला आहे. त्यामुळे आर्थिक गणित बिघडणार आहे.

- डॉ. विवेक भिडे, बागायतदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change in environment affects Hapus in Konkan