आंबेडकरी अनुयायांचा चवदार तळ्यावर सागर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

महाड - ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नाही; तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे...’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रखर विचारातून प्रेरित झालेला व अस्पृश्‍यता आणि गुलामगिरीचे जोखड तोडून सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाचा ९० वा वर्धापनदिन येथे सोमवारी (ता. २०) उत्साहात झाला. 

महाड - ‘हा संगर केवळ पाण्यासाठी नाही; तर मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे...’ या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रखर विचारातून प्रेरित झालेला व अस्पृश्‍यता आणि गुलामगिरीचे जोखड तोडून सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाचा ९० वा वर्धापनदिन येथे सोमवारी (ता. २०) उत्साहात झाला. 

डॉ. आंबेडकरांनी येथील चवदार तळ्यावर २० मार्च १९२७ रोजी ऐतिहासिक सत्याग्रह केला. या तळ्याचे पाणी प्राशन करून दलित समाजाला गुलामगिरी व अस्पृश्‍यतेच्या अनिष्ट प्रथेतून मुक्त केले. महाडमध्ये हा दिवस क्रांतिदिन म्हणून पाळला जातो. रविवारी सायंकाळपासून महाडला आंबेडकरी अनुयायी तसेच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे समुदाय येत होते. निळा, पांढरा पोशाख परिधान केलेल्या भीमसैनिकांनी चवदार तळे व परिसर फुलून गेला होता. या क्रांतिदिनानिमित्ताने चवदार तळे येथे जणू भीमसैनिकांचा सागर लोटला होता. येथे येणारा प्रत्येक जण, ज्या पायऱ्यांवरून उतरून डॉ. आंबेडकर यांनी चवदार तळ्यातील पाणी प्राशन केले, त्या पायऱ्यांवर उतरून पाणी प्राशन करत होता. हे पाणी सोबत नेले जात होते.  

येथे असणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रीघ लागली होती. राज्यातील विविध भागातून वेगवेगळ्या वाहनांनी आलेले आंबेडकरी अनुयायी चवदार तळे, क्रांतिभूमी या परिसरामध्ये उतरले होते. चवदार तळे, दस्तुरी नाका व क्रांतिस्तंभ मार्ग येथेही भीमसैनिकांनी गर्दी केली होती. भीमगीतांनी सारा परिसर दुमदुमत होता. डॉ. बाबासाहेबांचे साहित्य, घटनेची पुस्तके, दलित वाङ्‌मय, गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांचे विविध आकाराचे पुतळे, की-चेन्स, फोटो फ्रेम विक्री करणारी अनेक दुकाने या भागात मांडण्यात आली होती. खरेदीसाठी अनेकांची धावपळ सुरू होती. 

नेत्यांची भेट 
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महाडचे आमदार भरत गोगावले, सभापती सीताराम कदम, उपसभापती सुहेब पाचकर, जि. प. सदस्य जितेंद्र सावंत, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांनी चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केले. येथे आलेल्या भीमसैनिकांसाठी पालिकेने पिण्याचे पाणी व अन्य सुविधा पुरवल्या होत्या. विविध दलित सामाजिक संघटनांकडून अन्नदान कक्ष उघडण्यात आले होते. ‘२० मार्च’ या मिनरल वॉटरचे लाँचिंगही करण्यात आले. 

राज्यभरातून भीमज्योती  
भीमसैनिक, विविध संघटना यांच्यामार्फत प्रभातफेरी, अभिवादन, सलामी असे कार्यक्रम करण्यात आले. राज्यातील विविध भागांतून भीमज्योती आल्या होत्या. बौद्धजन पंचायत समिती, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), गवई गट यांच्या अभिवादन सभा, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे श्रावणेर शिबिर असे अनेक कार्यक्रम दिवसभरात झाले.

Web Title: chavdar tale mahad

फोटो गॅलरी