काजू बी खरेदीत परप्रांतीयांकडून फसवणूक 

काजू बी खरेदीत परप्रांतीयांकडून फसवणूक 

लांजा - तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या भोळेपणाचा व अशिक्षितपणाचा फायदा उठवत परप्रांतीय भैये व बटर-टोस्ट विक्रेत्यांकडून काजू बीच्या खरेदीमध्ये फसवणूक केली जात आहे. बाजारभावापेक्षा अधिक भाव देण्याचे आमिष दाखवून वजन काट्यामध्ये बेमालूमपणे कमी वजन दाखवून काजू बीची खरेदी केली जात आहे. अशाप्रकारे जनतेची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. 

तालुक्‍यात गेल्या काही वर्षांपासून आंबा-काजूच्या लागवडीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. याचाच फायदा परप्रांतीय विक्रेत्यांकडून घेतला जातो. मार्च ते मे या महिन्यात काजूच्या उत्पादनाला सुरूवात होते. याच कालावधीत तालुक्‍याच्या गावागावांमध्ये बटर-टोस्ट विक्री करणाऱ्या परप्रांतीयांचे टोळके दाखल होतात. अशा विक्रेत्यांकडून गोरगरीब जनतेच्या अज्ञानपणाचा व भोळेपणाचा फायदा उठवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते.

चुकीच्या काटयांमधून काजूचे मोजमाप करताना हातचलाखी करून कमी वजन दाखवतात. एखाद्या ग्रामस्थाने 10 ते 20 किलो काजू बी दिली तरी ती 5 ते 10 किलो कमीच भरते. मात्र, या विक्रेत्यांच्या भुलथापांना येथील गरीब लोक सहज बळी पडतात. त्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची फसवणूक करणे अशा व्यावसायिकांना सहज शक्‍य होते.

तालुक्‍याच्या ग्रामीण भागामध्ये सद्यस्थितीत अशाप्रकारे अनेक परप्रांतीय विक्रेत्यांकडून गोरगरीब जनतेची काजू बीच्या खरेदीमध्ये फसवणूक केली जात आहे. ग्रामस्थांची फसवणूक करून आणलेली काजू बी ही लांजातील काजू बी विक्रेत्यांकडे विकून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा हा प्रकार सध्या सुरूच आहे. 

तंटामुक्त समितीने लक्ष घालावे 
या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती यांनी याबाबत जागरूक राहून फसवणूक करणाऱ्या भैये व टोस्ट-बटर व्यावसायिकांवर बंदी घालून कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. 

वजनकाटे शासनाकडून प्रमाणित नाहीत 
टोस्ट-बटरच्या बदल्यात काजू बीची खरेदी केली जाते. मात्र, काजू बी मोजण्यासाठी असणारे वजनकाटे शासनाकडून प्रमाणित केलेले नसल्याची बाब उघडकीस येत आहे. अशाप्रकारे या परप्रांतीय विक्रेत्यांकडून जनतेला काजू बीच्या खरेदीसाठी कधी बाजारभावापेक्षा अधिक पैशांचे आमिष दाखवून तर कधी टोस्ट-बटरच्या मोबदल्यात काजू बी खरेदी केली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com