रत्नागिरी : लोटेतील रासायनिक उद्योग मंदीच्या उंबरठ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 September 2019

चिपळूण - ऑटोमोबाईल क्षेत्रानंतर केमिकल इंडस्ट्री जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. त्याची झळ रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेतील सर्वांत मोठ्या औद्योगिक वसाहतीला बसण्याची शक्‍यता आहे. येथील काही मोठ्या कारखानदारांनी उत्पादन करताना दक्षता घेण्यास सुरवात केली.

चिपळूण - ऑटोमोबाईल क्षेत्रानंतर केमिकल इंडस्ट्री जागतिक मंदीच्या उंबरठ्यावर आहे. त्याची झळ रत्नागिरी जिल्ह्यातील लोटेतील सर्वांत मोठ्या औद्योगिक वसाहतीला बसण्याची शक्‍यता आहे. येथील काही मोठ्या कारखानदारांनी उत्पादन करताना दक्षता घेण्यास सुरवात केली. छोट्या सहाय्यक कारखान्यांनाही उत्पादन करताना अतिरिक्त उत्पादन न करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक मंदीचे परिणाम हळूहळू येथील उद्योगधंद्यांना जाणवू लागले आहेत. 

लोटेतील औद्योगिक वसाहतीत केमिकल व पेस्टीसाईडचे उत्पादन घेतले जाते. लोटेसह खेर्डी व खडपोली औद्योगिक वसाहतीतील उत्पादन देश-विदेशात पाठविले जाते. लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखानदार वर्षाला सुमारे एक हजार 400 कोटींचा कर शासनाला भरतात. म्हणजेच येथील वार्षिक उलाढाल 12 ते 14 हजार कोटींच्या दरम्यान आहे.

अमेरिका आणि चीन या प्रगत देशांमध्ये व्यापारी युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. चीनने पर्यावरणाचे नियम व कायदे कडक केले आहेत. त्याचा फायदा घेऊन आपला व्यापार जगभरात वाढविण्याची भारताला संधी होती. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. त्यामुळे हळूहळू केमिकल इंडस्ट्रीवर मंदीचे सावट आहे. लोटेतील मोठ्या कारखानदारांना लागणारे पॅकिंगचे साहित्य आणि कच्चा माल छोट्या कंपन्या पुरवितात.

कंपन्यांकडून मागणी वाढली तर मालाचा पुरवठा कमी पडू नये किंवा सुटीच्या काळात पुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून काही लघुउद्योजक अतिरिक्त मालाचे उत्पादन करून ठेवतात. जागतिक मंदीच्या पार्श्‍वभूमीवर अशा छोट्या कारखानदारांना मागणीपेक्षा जास्त उत्पादन करू नका, अशा सक्त सूचना करण्यात आल्या आहेत. 

""लोटेतील ए. बी. मौरी आणि गाणे खडपोली येथील साफयिस्ट कंपनीत यिस्ट बनविले जाते. बिस्कीट बनविणाऱ्या "पारले जी'सारख्या मोठ्या कंपन्यांना हे यिस्ट पाठविले जाते. पारले जी कंपनीने मंदीमुळे 25 हजार कामगार कमी केले. त्याचा परिणाम निश्‍चितच यिस्टचा पुरवठा करणाऱ्या साफयिस्ट व ए. बी. मौरीसारख्या कंपन्यांवर होण्याची शक्‍यता आहे.'' 
- सुनील शिर्के,
उद्योजक, लोटे (ता. खेड) 

""एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे पगार थांबविण्याचे आदेश आहेत. वापीतील "एमआयडीसी'ला 120 कोटींचा दंड लागला आहे. अशाने एमआयडीसीसह कारखानदार अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र सरकारचे पर्यावरणविषयक धोरण कारखानदारांच्या विरोधातील असल्याचे दिसते.'' 
- प्रमोद नलावडे,
कामगार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The chemical industry in Lotte is on the verge of recession