शिवाजी महाराजांशी सावंतवाडीचा संघर्ष अन् शौर्य दाखवणाऱ्या घोड्याचे स्मारक 

Chhatrapati Shivaji Maharaj and King Lakhan Sawant of Sawantwadi Sansthan battles memorise sindhudurg historical martahi news
Chhatrapati Shivaji Maharaj and King Lakhan Sawant of Sawantwadi Sansthan battles memorise sindhudurg historical martahi news

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी संस्थानचे राजे लखम सावंत यांच्यात दोनवेळा मोठ्या लढाया झाल्या. यातील एक लढाई महाराज तर दुसरी सावंतवाडी संस्थानने जिंकली. त्या काळात ही दोन स्वतंत्र सत्तास्थाने होती. त्यामुळे या संघर्षाकडे दोन राज्यांमधील तत्कालीन स्थितीनुसार झालेला संघर्ष असेच बघावे लागेल. या लढाया होवूनही त्यांच्यात झालेला तह मराठ्यांचे राज्य स्थापन व्हावे, या मुद्‌द्‌यावर झाल्याचे दिसते. हा सत्तासंघर्ष जाणून घेण्याचा हा प्रयत्न... 

लखम सावंत यांच्या कारकीर्दीत सावंतवाडी संस्थान खऱ्या अर्थाने ताकदवान राज्य म्हणून उदयाला येत होते. सावंत-भोसले घराण्याने कुडाळच्या परगण्यावर वर्चस्व मिळवून दक्षिण कोकणात दबदबा निर्माण केला. याचदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य सुरू केले होते. कोकण त्यांच्यासाठीही महत्त्वाचे होते. कारण या भागात अनेक दुर्गम आणि जिंकण्यास कठिण असणारे किल्ले होते. शिवाय समुद्र असल्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने कोकण महत्त्वाचे होते. महाराजांच्या गनिमी काव्याच्या युध्दकौशल्यात कोकणातील दुर्गम भौगोलिक स्थिती उपयोगी पडणारी होती. 

महाराजांनी कोकणातील विजापूरच्या बादशहाकडे असलेला भाग जिंकून घेत आपली सत्ता स्थापन करायला सुरूवात केली. लखम सावंत यांनी विजापूरच्या बादशहाला आपण महाराजांकडून कोकण प्रांत सोडवून देतो अशी ग्वाही दिली. बादशहाने त्यांना खवास खान नावाचा एक सरदार दहा हजाराच्या फौजेसह मदतीला पाठवला. मागून बाजी घोरपडे-मुधोळकर हे 1500 स्वारांसह खवास खानाच्या मदतीला येत होते. शिवाजी महाराजांना हे कळल्यामुळे त्यांनी बाजी घोरपडेंना वाटेतच गाठून ठार केले. खवास खानाचाही गनीमीकावा वापरून पराभव केला. यामुळे तो पळून गेला. यानंतर शिवाजी महाराजांनी कुडाळ प्रांतात सैन्य घुसवून लखम सावंत यांच्या ताब्यातील ठाणे किल्ले ताब्यात घ्यायला सुरूवात केली. 

अखेर लखम सावंत आणि त्यांचे पुतणे खेम सावंत हे गोव्यातील पोर्तुगिजांच्या आश्रयाला गेले. महाराजांनी पोर्तुगिजांवरही हल्ला करून त्यांचा फोंडा येथील मजबूत गड ताब्यात घेतला. त्यामुळे नरमलेल्या पोर्तुगिजांनी महाराजांशी तह करत त्यांना तोफा नजराणा म्हणून दिल्या. त्यामुळे लखम सावंत यांना आश्रय देणे पोर्तुगिजांसाठी कठिण बनले. शेवटी लखम सावंत यांनी पितांबर शेणवी यांना शिवाजी महाराजांकडे वकील म्हणून पाठवले. मराठी राज्याची स्थापना करण्याचा दोन्ही राजांचा समान हेतू असल्यामुळे शिवाजी महाराजांनी तह करण्याचा निर्णय घेतला. 


अखेर एप्रिल 1659 मध्ये शिवाजी महाराज आणि लखम सावंत यांच्यात तह झाला. त्यानुसार महाराजांनी कुडाळ प्रांतात घेतलेले किल्ले आणि ठाणी सावंत यांच्या स्वाधिन केली. सावंत यांनी या प्रांताच्या वसुलीतून दरवर्षी सहा हजार होन घेवून तीन हजार इतकी फौज ठेवावी आणि गरज असेल तेव्हा महाराजांना मदत करावी असे ठरले. त्यानुसार लखम सावंत यांना कुडाळची देशमुखी आणि सावंत बहादर हा किताब देण्यात आला. याचवेळी महाराजांनी लखम सावंत यांचे सरदार राम दळवी आणि तान सावंत यांना एक एक हजार स्वारांची मनसबदारी दिली. 

आपले तीन सरदार कुडाळ प्रांताच्या वेगवेगळ्या ठिकाणी नेमले. नंतर मात्र हा तह फार काळ टिकला नाही. लखम सावंत यांनी विजापूरच्या बादशहाशी पुन्हा सलोखा केला. त्याकाळात तळकोकणात विजापूरकरांचा अजीजखान सरनोबत हा सुभेदार होता. सावंत यांनी त्याला मदत करून कुडाळ प्रांतातील शिवाजी महाराजांची सर्व ठाणी उठवली. अजीजखानने विजापुरच्या बादशहाकडे लखम सावंत यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. यामुळे बादशहाने 1664 मध्ये मालवण येथील हक्‍क लखम सावंत यांना बहाल केले. पुढच्या काळात कुडाळ परगण्याची सुभेदारी (नाडगौडकी) देवून मसुरे, पेंडूर, घावनळे, मळगाव, मठ, होडावडे, आरवली, रेडी व आरोंदा हे भाग लखम सावंत यांना इनाम म्हणून दिले. 

याच दरम्यान शिवाजी महाराज पुन्हा कोकणच्या स्वारीवर आले. त्यांनी रांगणा उर्फ प्रसिध्द गड हा किल्ला ताब्यात घेतला. तो परत मिळवण्यासाठी विजापूरहून बलूल खान नावाचा सदरदार मदतीला आला. त्याच्या सैन्यासह लखम सावंत यांनी रांगणा गडावर हल्ला केला; मात्र शिवाजी महाराजांची तयारी चांगली होती. त्यामुळे यात सावंत यांना यश आले नाही. यानंतर कुडाळ प्रांताच्या देशमुखीची वस्त्रे शिवाजी महाराजांनी कृष्ण सावंत यांना दिली. हे कृष्ण सावंत मुळचे तिरवडे येथील असल्याचे सांगितले जाते. ते काहीकाळ सावंतवाडीकर सावंत भोसले यांच्याकडे सरदारकीला होते. या घराण्यातील रामसावंत, रवळसावंत हे बंडात सहभागी झाल्यामुळे त्यांच्याकडून सरदारकी काढून घेतली गेली. याच घराण्यातील कृष्णसावंत यांच्याकडे सरदेशमुखीची वस्त्रे आली. 

ही वस्त्रे परत मिळवण्यासाठी लखम सावंत यांनी बादशहाची मदत मागितली. बादशहाने वझीर महम्मद एकखलासखान याला कोकणचा सुभेदार व श्रीपतराव मजलसी यांना कारभारी नेमून मदतीला पाठवले. यानंतर त्यांच्या मदतीने लखम सावंत आणि शिवाजी महाराज यांची कुडाळ येथे मोठी लढाई झाली. यात लखम सावंत यांनी शौर्याची पराकाष्टा केली. यामुळे शिवाजी महाराजांना पराभव पत्करून मागे फिरावे लागले. या पराक्रमामुळे बादशहाने सावंत यांना चौकुळ गाव मोकळा करून दिला. पुढे सावंत यांनी बाकीचा मुलखही ताब्यात घेतला. इतके होवूनही कृष्णसावंत त्यांच्या हाती लागले नाही. शेवटी लखम सावंत यांनीच त्यांना कैद करून ठार केले. आणि 1665 मध्ये बादशहाच्या ताबेदारीत त्यांनी देशमुखीची सत्ता कायमची स्थापन केली. लखम सावंत यांचे 1675 मध्ये निधन झाले. लखम सावंत यांच्या शौर्याचे शिवाजी महाराजांनीही कौतुक केल्याचे संदर्भ मिळतात. 

पुन्हा आणली समृध्दी 
लखम सावंत यांच्या कारकीर्दीत लढाईमुळे पूर्ण प्रांत ओस पडला होता. सगळीकडे अस्थिरता होती. गावांमध्ये शेती-भाती थांबली होती. याचा परिणाम राज्याच्या महसुलावरही होत होता. लखम सावंत यांनी ही अवस्था बघून राज्यात सुबत्ता आणण्यासाठी लागवड सुरू केली. लोकांना विश्‍वासात घेवून काम केले. यामुळे ओस पडलेला तत्कालीन प्रांत पुन्हा समृध्द झाला. 

 शौर्य दाखवणाऱ्या घोड्याचे स्मारक 
नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी जुना बाजार भागात एक घोड्याचे स्मारक आहे. हे राजाच्या घोड्याचे स्मारक असल्याचे स्थानिक सांगतात. उपलब्ध मौखीक संदर्भानुसार हा घोडा लखम सावंत यांचा होता. एका युध्दादरम्यान या घोड्याने प्रयत्नांची पराकाष्टा करत राजाचे संरक्षण केले. युध्दाहून परतत असताना तत्कालीन नरेंद्रावरील राजवाड्याच्या वाटेवर या घोड्याने प्राण सोडले. त्याचीच आठवण म्हणून हे घोड्याचे स्मारक उभारले गेल्याचे सांगण्यात येते.  

संपादन- अर्चना बनगे


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com