गणेशोत्सव तयारी : बाहेरून येणार्‍यांना क्वारंटाईन करण्यावर भर, लवकरच व्हीजन निश्‍चित : डॉ. इंदुराणी जाखड

राजेश कळंबटे
Tuesday, 21 July 2020

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड पत्रकार परीषद...

रत्नागिरी :  जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून बाहेरून येणार्‍यांना क्वारंटाईन करण्यावर सर्वाधिक भर दिला जाईल. स्थानिक लोकांमध्ये संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देऊ, असा विश्‍वास नुतन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तसेच जिल्ह्यातील अडीअडचणींचा आढावा घेऊन व्हीजन निश्‍चित करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

डॉ. इंदूराणी जाखड यांनी नागपूरला प्रोबेशन कालावधी पूर्ण केल्यानंतर गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाल्या होत्या. तेथील जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरही त्यांनी काही महिने काम केले होते. रत्नागिरीत बदली झाल्यानंतर सोमवारी (. 20) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार स्विकारल्यानंतर मंगळवारी डॉ. जाखड यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचा आढावा घेतला. त्यामध्ये शिक्षण, महिला बालकल्याण विभागासह अन्य खात्यात रिक्त जागा अधिक असल्याचे दिसून आले. जिल्ह्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

हेही वाचा- जाणून घ्या चिपळूणातील कोरोनामुक्तीची वाटचाल....

गडचिरोलीप्रमाणे रत्नागिरीतही भौगोलिकदृष्ट्या अडचणीची गावे आहेत. तिथे काम करणे आव्हानात्मक असते. गडचिरोलीमधील कामाचा अनुभव याठिकाणी उपयुक्त ठरु शकतो. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा नुकताच घेतला. सध्या जिल्ह्यात 472 कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. बाहेरून आलेल्यांमुळे कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न राहील. जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करुन याबाबत विशेष नियोजन करण्यावर भर राहील. केसेस वाढल्यास जादा बेडची व्यवस्था करुन दिली जाईल.

हेही वाचा- त्या बैठकीला उपस्थित होते नाईक  : पालकमंत्री उदय सामंतसह वरिष्ठ  अधिकारी यांच्यावर क्वारंटाइनची टांगती तलवार..... -

गणेशोत्सव कालावधीबाबत शासनाने नुकत्याच महत्त्वाच्या सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार या कालावधीत कोरोनाच नियंत्रणाबाहेर जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. जिल्ह्यात आरोग्य विभागाचे कामकाज चांगल्या पध्दतीने सुरु असून रत्नागिरीत येताना आमचीही तपासणी केली गेल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्याच्या विकासावर भर देण्यासाठी येथील अडीअडचणी समजून घेणार आहे. त्यानंतर योग्य निर्णय घेणे मला शक्य होईल. पत्रकारांकडून माहिती घेतल्यानंतर डॉ. जाखड यांनी पर्यटनाला चालना देणारे, जिल्ह्यातील पडीक जमिनींवर लागवड करणे, चाकरमान्यांना गावातच रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न आणि धनगरवाड्यांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी हे सकारात्मक आहेत. गडचिरोलीत काम करताना चांगला अनुभव मिळालेला आहे. तेथील लोकप्रतिनिधींचे चांगले सहकार्य मिळाले होते, असे इंदुराणी जाखड यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Executive Officer Dr Indurani Jakhar press conference in ratnagiri