मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच कोकणात  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

मुख्यमंत्री ठाकरे लवकरच कोकणात  
विनायक राऊत यांची माहिती ; कोकणच्या भूमीला सुजलाम करण्यासाठी प्रयत्न 

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) : रयतेचे राजा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उपयोग कोकणच्या भूमीला सुजलाम करण्यासाठी करणार आहे . लवकरच त्यांचा कोकणदौरा खास शेतीक्षेत्राशी निगडीत असणार आहे , असे प्रतिपादन घोटगे येथे शिवसेना सचिव तथा लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत यांनी केले. जिल्हा परिषद आंब्रडची पोटनिवडणूक 12 रोजी होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर लोकसभा गटनेते खासदार राऊत यांनी घोटगे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली .

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत , अतुल रावराणे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर , तालुकाप्रमुख राजन नाईक , उमेदवार जान्हवी सावंत , दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी , संजय शिरसाट , विजय देसाई , सुनील भोसले , माजी सभापती भिवा घाडीगावकर , उमेश सावंत , अविनाश नाईक , ज्ञानदेव धुरी , निशांत तेरसे , गणेश घोंगळे , सतीश कुडाळकर , शिवसेना पदाधिकारी , आदी उपस्थित होते. 

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी चांगला विचार

राऊत म्हणाले, 'मुख्यमंत्रिपदी रयतेचे राजा असणारे उद्धव ठाकरे विराजमान झाले आहेत . त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी , बागायतदारांना यापुढे आता तुटपुंजी मदत मिळणार नाही तर आनंद देणारा निर्णय ते लवकरच घेणार आहेत . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती कशी मिळेल या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार आहे . महाराष्ट्रासह सातत्याने कोकणवर नितांत प्रेम असणारे मुख्यमंत्री ठाकरे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी चांगला विचार करतील . त्यामुळे भविष्यात कोकणला सुगीचे दिवस येणार आहेत .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास दूर नाही

जनतेला आवश्‍यक असणारा विकास , वीज , रस्ता , पाणी , आरोग्य देत असतानाच रोजगाराचा प्रश्‍नसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुटणार आहे . श्री. ठाकरे यांच्या सोबत गेले कित्येक वर्षे मी भावासारखा वागत आहे . कालही त्यांच्यासोबत होतो आजही आणि भविष्यातही त्यांच्यासोबतच असेन . त्यामुळे या राज्याचा रयतेचा राजा असणाऱ्या ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास दूर नाही . सामान्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या जाणणारे श्री. ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.' 

...म्हणूनच मान्येकर हे दुसऱ्या गटात 

आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विरोधी पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्याने माझ्या माध्यमातून विविध विकासकामे करून घेतली. सातत्याने त्यांच माझ्या घरी जाणे-येणे होतं. त्यांचे अनेक प्रश्‍न प्रामाणिकपणे सोडवले. विकासासाठी कधीच विरोधकांच्या भूमिकेत नसतो; मात्र विकास करताना वाईट गोष्टींना साथ देत नाही. वाईट गोष्टींना साथ न दिल्यामुळेच ते दुसऱ्या गटात गेले आहेत. त्याचा विचार करू नये.

काम करणारा उमेदवार कोण ?

गावातला उमेदवार कोण ? यापेक्षा काम करणारा उमेदवार कोण? हे मतदारांनी जाणून घेऊन शिवसेनेच्या उमेदवार जान्हवी सावंत यांना विजयी करावे. यावेळी सोनवडेतील अरुण घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे खासदारांनी स्वागत केले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Uddhav Thackeray Come Soon In Konkan